'आरक्षण नसल्याने माझ्या मुलांना...'; सुसाईड नोट लिहून शिवरायांच्या स्मारकासमोरच स्वत:ला संपवलं

Maratha Aarakshan Man Committed Suicide: या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 14, 2023, 12:09 PM IST
'आरक्षण नसल्याने माझ्या मुलांना...'; सुसाईड नोट लिहून शिवरायांच्या स्मारकासमोरच स्वत:ला संपवलं title=
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

Maratha Aarakshan Man Committed Suicide: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापलेला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत सगळीकडे याच विषयाची चर्चा आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील काही तरुणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणही समोर आली आहे. यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथील एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. बुधवारी (13 डिसेंबर, 2023 रोजी) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास विजय पुंडलिक राकडे या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचं पाऊल उचललं. 

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

मराठा आरक्षणाच्या मागीसाठीच्या आंदोलनामध्ये विजय हा फार सक्रीयपणे सहभागी झाला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने विजय अनेकदा चिंता व्यक्त करायचा. याच चिंतेने त्याने बुधवारी खामगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतलं. विजयने विष प्राशन केल्याचं नातेवाईकांना समजल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. खासगी वाहनाने विजयला फुलंब्री येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. विजयची प्रकृती खालावत चालल्याने त्याला रुग्णवाहिकेने छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेण्यापूर्वीच मृत घोषित केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करतोय असं विजयच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे.

चिठ्ठीत काय लिहिलं आहे?

विजयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये, "माझ्या‎ मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मी‎ पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या‎ मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात‎ त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही‎. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण‎ मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत ‎आहे," असं लिहिलं आहे.

आत्महत्या न करण्याचं आवाहन

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजातील तरुण आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक गावांमध्ये लाक्षणिक उपोषणं केली जात आहेत. मात्र, आरक्षणाचा मुद्दा वेळीच मार्गी लागत नसल्याने आणि यासाठी विलंब होत असल्याने हताश होऊन तरुण आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच मनोज जरांगे पाटील यांनीही केलं आहे. मात्र त्यानंतरही आत्महत्येचं सत्र थांबताना दिसत नाही.