'ज्या दोघांनी वाद घातला त्यांना...'. मराठा समाज आपापसात भिडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, 'नसता जाळ...'

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजात झालेल्या राड्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज मोठा असून, भांड्याला भांडं लागत असतं असं ते म्हणाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Mar 29, 2024, 04:47 PM IST
'ज्या दोघांनी वाद घातला त्यांना...'. मराठा समाज आपापसात भिडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, 'नसता जाळ...' title=

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याच्या हेतूने बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान हा वाद झाला. यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये काही महिलांचाही समावेश होता. दरम्याम मनोज जरांगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज मोठा असून, भांड्याला भांडं लागत असतं असं सांगत त्यांनी यावर जास्त भाष्य करण्यास नकार दिला. 

मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे असतील तर प्रत्येत जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार उभा करण्याचा पर्याय दिला आहे. गावोगावी सगळ्यांनी मराठा बांधवांशी बोलून मतं जाणून घ्यावी आणि अंतिम निर्णय घ्यावा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण यादरम्यान हा राडा झाला. 

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

"मराठा समाज मोठा असल्याने भांड्याला भांडं लागत असतं. त्यावर लगेच काही भूमिका घेण्याची गरज नाही. पण वादात सहभागी दोन्ही बांधवांना बोलावून घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करु. त्यांचा नेमका विषय समजून घेऊ. यातून नक्की मार्ग निघेल आणि तुम्हाला मराठा समाज एकत्र दिसेल," असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

पुढे ते म्हणाले आहेत की, "आपली मतं ग्राह्य धरली जात नसतील, किंमत दिली जात नसेल तर एका टोकाच्या भूमिकेवर यावं लागतं. आम्ही जिंकू शकत नसलो तरी तुम्हाला पाडू शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे. ही शक्ती मराठे यावेळी दाखवणार आहेत. यानंतर त्यांना नसता जाळ आपण अंगावर घेतला आहे हे समजेल".

संभाजीनगरमध्ये नेमकं काय झालं?

मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्ते आपापसात भिडले. या बैठकीत कोणीही उमेदवारीसाठी आपल्याकडून नावं सुचवू नयेत असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता. पण यावेळी अनेकजण नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानंतर हा राडा झाला. दरम्यान काहींनी यावेळी चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख झाल्याने राडा झाल्याचा दावा केला आहे. 

बैठकीत उपस्थित एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांची सकल मराठा समाजातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोणीतरी आपल्या व्यक्तीचं नाव सुचवत होतं. सर्वसमावेश उमेदवार द्यायचा असं आमचं ठरलं होतं. जास्त नावं झाली तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचं आणि ते अंतिम निर्णय घेतील असं ठरलं होतं. पण येथे काही नावं घेत बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला आणि वाद झाला.