मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल असा गुन्हा नाशिकमध्ये घडलाय. विमा योजनेचे चार कोटी रुपये मिळवण्यासाठी एकानं साथीदारांच्या मदतीनं स्वतःच्या अपघाती मृत्यूचा कट आखला. एवढंच नव्हे तर एका निष्पाप वेटरचा खूनही केला.
चांदवड तालुक्यातील तांगडी शिवारात राहणा-या रामदास पुंडलिक वाघ गेल्या ९ जून २०१७ रोजी अपघाती मृत्यू झाला. पण पोलिसांनी त्याला फरार आरोपी घोषित केलंय.
रामदासनं दीड वर्षांपूर्वी सुमारे 4 कोटी रूपयांची विमा पॉलिसी काढली होती. ती रक्कम मिळवण्यासाठी या रामदासनं स्वतःच्याच अपघाती मृत्यूचा कट रचला. त्यासाठी मित्र सतीश गुरगुडे, श्रावण वाळूंजे आणि सागर वाळूंजे यांची त्यानं मदत घेतली.
विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्यांना गरज होती एका मृतदेहाची. तांगडी गावातील हॉटेलमध्ये चांद मुबारक नावाचा भोळसट तरूण वेटरचं काम करायचा. या चौघांनी त्याचं अपहरण करून, गळा आवळून त्याचा खून केला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोरंगण घाटात त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला. त्याआधी मृतदेहाला रामदासचे कपडे घालण्यात आले. ओळखीसाठी रामदासचं ओळखपत्र तसंच पॅन कार्डही मृतदेहाच्या खिशात ठेवण्यात आलं.
रामदासची दुचाकीही मृतदेहाजवळ फेकून देण्यात आली. चेह-याची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाच्या चेह-यावरून गाडीचं चाक नेण्यात आलं... याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केली. पण थोडीफार कुणकुण लागल्यानंतर पोलिसांनी घटनेच्या मुळाशी जाऊन तपास केला असता हा सगळा बनाव उघडकीस आला.
मग सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा, हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. 1800 किलोमीटरचा प्रवास करून नाशिक ग्रामीण पोलीस तमिळनाडूतील चांद मुबारकच्या घरापर्यंत पोहोचले. या गुन्ह्याचा छडा लागल्यानंतर पोलिसांनी तिघा संशयितांना बेड्या ठोकल्यात. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास वाघ मात्र अजूनही फरार आहे. तो हाती लागल्यानंतर या कटातील अनुत्तरीत प्रश्नांचाही उलगडा होणार आहे.