नागपूर : लॉकडाऊनच्या काळात विविध संस्थांच्या माध्यमातून वाटल्या जाणाऱ्या जेवणाच्या पाकिटाचे वाद होऊन एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन मधील मेहता पेट्रोल पंप जवळ आज पहाटे ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मेहता पेट्रोल पंप जवळ काल रात्री काही लोकांनी रस्त्यावरील भिक्षेकरी आणि मजुरांना जेवणाचे पेकेट्स वाटले होते. त्यात एका सिक्युरिटी गार्डला दिलेल्या पेकेटमध्ये सर्व अन्न नसल्याने त्याने सहकारी मजुरांकडे सांगितले होते. २ सहकारी मजुरांनी त्यांची टिंगल उडवत त्याला भिकारी असे संबोधून आपल्या पेकेट मधून अन्न काढून दिले. तेव्हा ही तिघांमध्ये वाद झाले. त्यानंतर सर्व जण तिथेच फुटपाठ वर झोपी गेले .
पहाटे ३ वाजता आरोपी सिक्युरिटी गार्डने लोखंडी रॉडने त्याला भिकारी संबोधणाऱ्या इतर दोन मजुरांच्या डोक्यावर वार करून एकाची हत्या केली. तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले. या घटनेनंतर आरोपी सिक्युरिटी गार्ड ने स्वतः पोलीस स्टेशन मध्ये येऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
गेल्यावर्षाच्या डिसेंबरपासून कोरोनाचं संक्रमण जगभरात झालं. भारतात कोरोनाला यायला जानेवारी महिना उजाडला. महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने प्रवेश केला. यानंतर कोरोनाने आपलं जाळं संपूर्ण देशभरात पसरलं. आतापर्यंत देशभरात ९०,९२७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार ९२७ झाली आहे. यामध्ये ५३ हजार ९४६ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान २, ८७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ३४ हजार १०९ रुग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबद्दल माहिती दिली आहे.
लॉकडाऊन ४ संदर्भात आज केंद्रीय गृह विभागाचे निर्देश येऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन ४ हा पूर्णपणे नवा असेल असेही ते म्हणाले. यामध्ये अनेक प्रकारचे बदल आणि सवलती दिल्या जातील असेही ते म्हणाले होते.