स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना

Malegaon Accident : मालेगावमध्ये यंत्रमागात अडकून एका महिलेचा जीव गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ज्या कारखान्यात त्या महिलेचा मृत्यू झाला तो तिचाच होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 8, 2023, 12:06 PM IST
स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना title=

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : यंत्रमागावर तयार होणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधून (Malegaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यंत्रमागात अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार मालेगावात घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात या महिलेचा भीषण मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी (Malegaon Police) या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

पावरलूमच्या तराशण यंत्रात ओढणी अडकून सादिया इसाक अहमद या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना नाशिकच्या मालेगावातील बडा कब्रस्थान भागात समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात ही महिला तराशण मशीनवर काम करीत असताना रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यंत्रमागासाठी धागा भरण्याच्या तराशण यंत्रामध्ये ओढणी अडकून झालेल्या दुर्घटनेत सादिया इसाक अहमद या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत सादिया इसाक अहमद यांचा  स्वतःच्या यंत्रमाग कारखाना आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेण्याच्या सुमारास त्या तराशण मशीनवर काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर मशिनमध्ये अडकून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

वर्षभरात घडतात 8 ते 10 घटना

यंत्रमाग हा मालेगावचा प्रमुख व्यवसाय असून, अनेक गोरगरीब महिला तराशण  भरण्याच्या कामासाठी जातात. ताराशण पट्ट्यात ओढणी व किंवा साडी अडकून महिला गंभीर जखमी होतात. अनेकदा बळी देखील जातो. वर्षभरात अशा 8 ते 10 दुर्घटना होऊन कुटुंब उघड्यावर येत आहेत.  या दुर्घटना टाळण्यासाठी काम करणाऱ्यांकडून कारखानदारांनी ऑटो कट व सेन्सर असलेल्या मशीन खरेदी करण्याची मागणी होत आहे.

खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सहा वर्षीच्या चिमुकल्याचा मृत्यू 

पावसाने शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा नामदास या सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा गावात घडली. मेंढपाळ असलेले नामदास कुटुंबीयाचा तीन महिन्यांपासून मांगबारी घाटातील नवश्या गणपती परिसरात वास्तव्य होते. मेंढ्या आवरत असताना केदा बराच वेळ दिसून न आल्याने त्याची शोधाशोध केली असता शेतामध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आढळून आला. तात्काळ त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला होता. एकुलत्या एक चिमुकल्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.