अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांनी घेतला मोठा निर्णय

Mahesh Jadhav: महेश जाधव यांनी मनसे पक्ष सोडल्यानंतरआता राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 18, 2024, 12:40 PM IST
अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांनी घेतला मोठा निर्णय title=
Mahesh Jadhav NCP

Mahesh Jadhav: गेल्या महिन्यात मनसे नेते पदावरुन हटवण्यात आलेले माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी वेगळी वाट धरली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याशी फोनवरून वाजल्यानंतर त्यांनी आपला मनसेतील पदाचा राजीनामा दिला होता. महेश जाधव आणि अमित ठाकरे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर कामगाराची बाजू लावून धरल्याने मला मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी मनसे नेत्यांवर केला होता. मारहाणीच्या घटनेनंतर मनसेचे दोन गट आमनेसामने येऊन त्यांच्यात जोरदार राडा झाला होता. 

महेश जाधव यांनी मनसे पक्ष सोडल्यानंतरआता राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. पूर्वी मनसेत असलेल्या महेश जाधवांनी अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. महेश जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटात जाणार आहेत. 

आज दुपारी 3 वाजता वाशीच्या रघुलिला मॉल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी महेश जाधव आपल्या हजारो माथाडींचे कामगारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे. 

कोणालाही सोडणार नाही

काही माथाडी कामगारांना घेऊन न्याय मागण्यासाठी मी अमित ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो.. माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचं काम मिळावं यासाठी मी भांडत होतो. पण अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा मित्र विनय अग्रवाल याच्या सांगण्यावरून मला मारहाण केली, असा आरोप महेश जाधवांनी केला.  मी अमित ठाकरे आणि राज ठाकरेंना एवढंच सांगेन, मला मारायचं असेल तर जीवे मारा पण मी तुमच्यापैकी कोणालाही सोडणार नाही,असे आव्हान त्यांनी दिले होते. सतत मराठी-मराठी करायचं आणि मराठीच्या नावाखाली आपल्याच माणसांवर अन्याय करायचा, असं सगळं त्यांचं चालू असतं, असेही ते म्हणाले होते. 

पक्ष कार्यालयात मारहाण

हे ठाकरे मराठी माणसाचे कैवारी नाहीत. हे थोतांड आणि दलाल आहेत. राज ठाकरेंचा पक्ष दलाल आहे, असा गंभीर आरोप महेश जाधवांनी केला होता. हा केवळ वसुली करणारा पक्ष आहे. या फेसबूक लाईव्हनंतर ते लोक माझा जीव घेतील, मला मारून टाकतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. राज आणि अमित ठाकरे यांच्या लोकांनी मला राजगड (पक्ष कार्यालय) येथे मारहाण केली. मी तिथून कसाबसा जीव वाचवून पळून आलोय. या माथाडी कामगारांनी मला वाचवलं आणि तिथून पळवून आणलं, असा अनुभव त्यांनी सांगितला होता.