कोकणी माणसाकडे आता शेवटचा पर्याय! मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ

मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ घालण्यात आला. जन आक्रोश समितीच्या वतीने या महायज्ञाचे आयोजदन करण्यात आले होते. 

वनिता कांबळे | Updated: Jul 28, 2024, 07:37 PM IST
कोकणी माणसाकडे आता शेवटचा पर्याय! मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ title=

Mumbai Goa Highway : कोकणात जाणारा एकमेव आणि तितक्‍याच महत्‍वपूर्ण मार्ग म्हणजे मुंबई गोवा हायवे. मात्र, हाच मुंबई गोवा हायवे कोकणी माणसासाठी त्रासदायक ठरत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्‍या रूंदीकरणाचं काम गेल्या 14 वर्षांपासून सुरु आहे.  त्‍यातच पावसाळा सुरू होताच हा रस्ता खड्डे आणि चिखलानं भरुन गेलाय त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणं जिकरीचं बनतं. मुंबई गोवा हायवेचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकणी माणसाने शेवटाच पर्याय अवलंबला आहे.  मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ करण्यात आला आहे. 

मागील 14 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे.  रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आलेली अवकळा दूर व्हावी यासाठी जन आक्रोश समितीच्या वतीने आज माणगाव इथं महायज्ञ करण्यात आला. महामार्गाचे दुष्ट चक्र संपावे आणि त्यासाठी प्रशासनाला सदबुद्धी यावी, चांगला ठेकेदार मिळावा यासाठी देवाला साकडे घालण्यात आले. माणगाव एस टी स्थानक परिसरात झालेल्या या अभिनव उपक्रमात शेकडो नागरिक सहभागी झाले होते
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं दुष्टचक्र या पावसाळ्यातही कायम आहे. मोठमोठे खड्डे या मार्गावर पडलेले आहेत. त्यामुळे वाहनांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतोय तर  दुसरीकडे महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी  पेव्हर ब्लॉकचा मुलामा दिला जातोय. 

मुंबई गोवा महामार्गावरच्या अर्धवट बांधकाम करणा-या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय. याबाबतचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलेयत. मुंबई गोवा महामार्गावरच्या अर्धवट पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या मार्गावरच्या रत्नागिरी- सिंधुदुर्गमधल्या 12 पुलांची कामं ठप्प आहेत. अंजणारी, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, वाकडे पुलांची कामं अर्धवट स्थितीत आहेत. दोन वर्षांची मुदत संपूनही कामं पूर्ण झाली नाहीत. त्यामुळं ठेकेदारावर कारवाईचे आदेश गडकरींनी दिलेयत. अशा ठेकेदारांकडून ठेका काढून घेण्याच्या हालचाली सुरू झालीयत. खासदार विनायक राऊतांनी याबाबतची माहिती दिली होती.