एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे काढायला सांगितले आणि...घाटी रुग्णालयातील संतापजनक घटना

Chatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरचा घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि आजूबाजूच्याही  जिल्ह्यांसाठी सगळ्यात मोठ हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो लोक उपचारासाठी येतात. मात्र याच दवाखान्यात एका तरुणीला संतापजनक प्रकाराला सामोरं जावं लागलंय.

राजीव कासले | Updated: Aug 30, 2024, 07:19 PM IST
एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे काढायला सांगितले आणि...घाटी रुग्णालयातील संतापजनक घटना title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची (Sexual Assault) घटना घडल्यानंतर राज्याभरात याचे पडसाद उमटलेत. ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून  (Chatrapati Sambhaji Nagar) संतापजनक आणि डोकं सुन्न करणारी घटना समोर आलीय. एका तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे ही घटना संभाजीनगरच्या प्रसिद्ध घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) घडली आहे. 

काय आहे नेमकी घटना?
घाटी रुग्णालयात एक तरुणी एक्स रे (x ray) करण्यासाठी आली होती.  रुग्णालयातल्या टेक्निशियनने तरुणीला कपडे काढायला सांगितले. त्यानंतर नराधम टेक्निशियनने तरुणीला स्पर्श करत अश्लील चाळे केले. तरुणीने ही माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी वासनांध टेक्निशियनला चांगलाच चोप दिला. घाटी रुग्णालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीनंतर या नराधम टेक्निशियनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 

हा धक्कादायक प्रकार 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. मात्र 29 तारखे पर्यंत घाटी रूग्णालय प्रशासनाने हा प्रकार दडवून ठेवला होता. अखेर घटना उघड झाल्यावर घाटी प्रशासनाने दखल घेत आरोपीविरुद्ध गुरुवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर अत्याचार करणारा हा आरोपी घाटी रुग्णालयामध्ये कामाला नाही.. रुग्णालयाच्या एक्स रे विभागात काम करणारी महिला टेक्निशियन गर्भवती असून ती रजेवर आहे. त्यामुळे आरोपीला एक्स रे काढण्यासाठी बाहेरुन बोलावलेलं होतं. कोविड काळात आरोपी काही दिवस रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. सध्या या आरोपीचा आणि रुग्णालयाचा काहीही संबंध नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केलाय. रुग्णालयात कार्यरत असलेल्या त्या महिला टेक्निशियनवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.. 

रुग्णालयातील या प्रकारानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने याबाबत अधिष्ठाच्या केबिनमध्ये जोरदार हंगामा केला आणि जाब विचारला.. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न निर्माण होतायत.. तसंच सरकारी रुग्णालयातही महिला किंवा तरुणी सुरक्षित नसल्याचंही समोर आलंय.