Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता

Maharashtra Weather Updates : पाऊस येणार, तापमानात आणखी चढ- उतार होणार... हवामान विभागाचा इशारा. पण, असं नेमकं होतंय तरी का? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण.   

सायली पाटील | Updated: Nov 10, 2023, 07:56 AM IST
Weather Updates : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं पाणी? हवामान विभागानं इशारा देत वाढवली चिंता  title=
Maharashtra weather updates heavy rain predictions in konkan vidarbha to experiance coldwave

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. दिवाळीच्या तयारीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या अनेकांनाच पावसानं सळो की पळो करून सोडलं. तिथं मराठवाड्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या कोकण पट्ट्यासह दक्षिण भागामध्येही पुढील दोन दिवस जोरदार पावसाची हजेरी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. किंबहुना या अवकाळी पावसामुळं कमाल आणि किमान तापमानामध्येही चढ उतार होण्याची चिन्हं आहेत. 

हेसुद्धा वाचा : Dhanteras Horoscope 10 November 2023 : आजची धनत्रयोदशी 'या' राशींना फळणार 

न बोलवताच आलेला पाहुणा... पाऊस 

गुरुवारी मुंबई उपनगरांमध्ये पावसानं अचानकच जोरदार हजेरी लावली. पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप , मुलुंड, गोवंडी तर पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, मालाड भागात जोरदार पाऊस कोसळला. ठाण्यात झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं होतं. या पावसाचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे शहरी भागांमध्ये असणारं प्रदुषणाचं प्रमाण तुलनेनं बरंच कमी झालं. हवेतील धुरकं विरल्याचंही यामुळं पाहायला मिळालं. 

पावसासाठी पूरक वातावरण 

काही दिवसांपासून अरबी समुद्रातील पूर्व क्षेत्रामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला असला तरीही या भागांमध्ये चक्राकार वारे मात्र कायमत आहेत. त्यामुळं राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरण असं चित्र पाहायला मिळू शकतं. पावसाच्या दृष्टीनं हे पोषक वातावरण पाहता यामुळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह रायगड आणि पुण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

विदर्भासह राज्याच्या डोंगराळ भागांमध्ये पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळू शकते. सोबतच या भागांमध्ये किमान तापमानाच काहीशी घटही नोंदवली जाऊ शकते. त्यामुळं वाहनं चालवताना दृश्यमानतेमध्ये अडचणी येऊ शकतात. 

काश्मीरमध्ये बर्फवृष्टी 

राज्यात पाऊस धुमाकूळ घालत असतानाच तिथं काश्मीरमध्ये मात्र कडाक्याची थंडी पडली आहे. काश्मीरच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टी, तर मैदानी भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळं पुंछा जोडणारा मुघल रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्येही किमान तापमानाच लक्षणीय घट होण्याची चिन्हं आहेत, त्यामुळं इथं येणाऱ्या पर्यटकांना अल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायला मिळू शकतो.