15 मेपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं. तर शहरात एकूण 10 ठिकाणी झाडं उन्माळून ठेवलंय.
शनिवार वाड्याच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळले असून संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. तसेच वेरूळ भागातही वादळी वा-यासह पाऊस झाला आहे. राजकीय सभांनाही पावसाचा फटका बसल्याचं दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर पावसाचं संकट पाहायला मिळालं.
पुण्यात मुसळधार पावसामुळे स्वारगेट एसटी डेपो पाण्याखाली गेला. संपूर्ण एसटी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल झाले. तसंच रस्त्यावरही वाहतूक कोंडीमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्या. शहरात सलग दुस-या दिवशी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे जनजीवन प्रभावित झालं.
सांगलीच्या वाळवा तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. कुरळपसह परिसरात वादळी वा-यासह गारपीट झाली. यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह पावसामुळे, आंबा, तसंच भाजीपाल्याचं नुकसान झालं. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागांतही ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान पावसामुळे गारवा निर्माण होऊन नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल असे सांगण्यात आले आहे. 12 मेपासून पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यात 11 व 12 मे रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारा असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर सातारा येथे 12 तारखेला मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह गारपिट आणि पावसाची शक्यता आहे. यामुळेच हवामान खात्याने पुणे व सातारा जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात 12 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ, येथे मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 14 मे पर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.