Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा दाह वाढत असतानाच अचानकच पावसानं हजेरी लावली आणि अवकाळीचा तडाखा पाहता पाहता हे संकट आणखी मोठं करताना दिसला. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गारपीटीचाही मारा झाल्यानं शेतपिकांचं मोठं नुकसान झालं ज्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र आकाळ निरभ्र राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात मधूनच पावसाच्या ढगांचं सावट येणार असलं तरीही इथं पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला राज्यातील थंडीचं प्रमाण अंशत: कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या कर्नाटकच्या दक्षिणेपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासोबतच वाढती आर्द्रता नोंदवली जाऊ शकते.
मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. हेच सत्र बुधवारीसुद्धा सुरु राहणार आहे. इथं 3 मार्चपर्यंत काश्मीरच्या खोऱ्यामध्ये बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं पुढच्या 24 तासांमध्ये या भागात जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिमी झंझावात भूमध्य सागर किंवा कॅस्पियन समुद्रात येणारं एक वादळच असून, भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता बळावते.
IMD नं वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान हरियाणा, पंजाब, चंदीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूर येथे ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, पंजाबच्या काही प्रांतासह उत्तर प्रदेशात गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये मात्र बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.