महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; संभाजीराजे, मनोज जरांगे याच्यासह बंददाराआड उपस्थित होता तिसरा महत्वाचा व्यक्ती

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती आणि जरांगे पाटलांची बंददाराआड चर्चा झालीय. विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी जरांगेची भेट घेतली. संभाजीराजेंच्या व्यासपीठावर त्यावेळी राजरत्न आंबेडकरही उपस्थित होते. त्यामुळं येत्या काळात राज्यात तिस-या आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार का, अशी चर्चा सुरू झालीय. 

वनिता कांबळे | Updated: Aug 15, 2024, 10:18 PM IST
महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग; संभाजीराजे, मनोज जरांगे याच्यासह बंददाराआड उपस्थित होता तिसरा महत्वाचा व्यक्ती title=

Sambhaji Raje Meet Manoj Jarange Patil : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी मराठा फॅक्टरचा परिणाम दिसून आलाय. आता सर्वच राजकीय पक्षांना तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. संभाजीराजे छत्रपतींनीही मनोज जरागे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेतली.. दोघांमध्ये बंददाराआड चर्चाही झाली.  बुधवारी सोलापुरात बोलताना संभाजीराजेंनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली आणि लगेच जरांगे पाटलांची भेट घेतली.. तेव्हा आगामी विधानसभेला राज्यात नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी सोलापूरमध्ये विधानसभा लढवण्याची घोषणा केली तेव्हा आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकरही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे राजरत्न आंबेडकरही संभाजीराजेंसोबत आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्यात. संभाजी राजे म्हणाले स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आमचे उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेले नाही. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न आहे. आम्हालासर्वपर्याय खुले आहेत. महायुती-महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आमचा संबंध येत नाही. तिसऱ्या आघाडीचा पर्यायही नाकारता येत नाही. आज माझ्यासोबत राजरत्न आंबेडकर  आहेत. ही सुरुवात झाली असून हा पहिला टप्पा आहे. आमच्यासाठी सर्वपर्याय खुले असल्याचेहीसंभाजीराजे यांनी सांगितले.

कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याची संभाजीराजेंची इच्छा होती मात्र वडील रिंगणात असल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली. जरांगेसोबत गेल्यात संभाजीराजे आणि स्वराज्य पक्षाला उभारी मिळू शकते. जरांगेंमुळे संभाजीराजेंच्या राजकीय कारकीर्दीला नवा अध्याय सुरू होऊ शकतो. दुसरीकडे महाराजांच्या वंशजांच्या पाठबळामुळे जरांगेंच्या आंदोलनाला नवीन बळ मिळू शकतं.  स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि राजेंचा अनुभव जरांगेंना मिळू शकतो. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील काही मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा परिणाम पाहायला मिळाला होता. त्यामुळं आता संभाजीराजे, जरांगे आणि राजरत्न आंबेडकरांची तिसरी आघाडी निश्चितपणे सत्ताधा-यांसह विरोधकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. राज्यातील या नव्या प्रयोगामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत  उलथापालथ होण्याची शक्यता आहे.