Maharashtra Weather News : मान्सूनं पहिल्या आठवड्यामध्ये दमदार प्रगती केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग बहुतांशी मावळल्याचं पाहायला मिळालं. बंगालच्या उपसागरावर असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानं ही परिस्थिती ओढावली. असं असलं तरीही राज्यात दाखल झालेले मोसमी वारे जिथं पोहोचले तिथं स्थिरस्थावर असून, त्यांमुळं राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळी पावसादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी इतका राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 14, 2024
हवामानाची स्थिती पाहता पुढील 24 तासांसाठी ठाणे, मुंबई, पालघरसह रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या भागांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शनिवार आणि रविवार हे बहुतांशी सुट्टीचे दिवस धरून पुढील चार ते पाच दिवसांसाठी मोसमी वाऱ्यांचा जोर तुलनेनं वाढणार असून, राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पावसाळी सहलींचा बेत आखण्यासाठीसुद्धा हे हवामान पोषक असून, यादरम्यान सह्याद्रीचा पट्टा, पश्चिम घाट परिसरावर वरुणराजाची सुखद हजेरी असेल.
Skymet या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगढ, ओडिशा, आंध्रप्रदेशचा किनारपट्टी भाह आणि पश्चिम बंगालच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून प्रगती तकरणार असून, इथंच एक पश्चिमी झंझावातही सक्रिय असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र उकाडा आणखी वाढणार असून, अद्याप या भागांमध्ये मान्सूनची चिन्हं नसल्याचं स्पष्ट होत आहे.