Maharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. असं असतानाच हा पाऊस नेमका पाठ कधी सोडणार हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात घरस करु लागला आहे.   

सायली पाटील | Updated: Apr 10, 2023, 07:06 AM IST
Maharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा title=
(छाया सौजन्य- स्कायमेट)/ Maharashtra Weather light rain for next 3 days hevy rain predictions in india summer latest Marathi news

Maharashtra Weather : केरळपासून (Kerala) विदर्भापर्यंत (Vidarbha) आणि कर्नाटकापासून (Karnataka) मराठवाड्यापर्यंत (Marathwada) झालेल्या काही महत्त्वाच्या हवामान बदलांचे थेट परिणाम सध्या अवकाळी पावसाच्या रुपात दिसून येत आहेत. रविवारी महाराष्ट्रातील बहुतांश भागाला गारपीट आणि जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यातच अनेक भागांमध्ये शेतपिकांचं नुकसानही झालं, तर कुठे वीजा कोसळून नागरिकांचा मृत्यूही ओढावला. अवकाळीनं हाहाकार माजवलेला असतानाच आता हवामान खात्याकडून मात्र सध्यातरी तो काढता पाय घेण्याच्या तयारीत नसल्याचं स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे. 

रविवारी पुणे शहर आणि परिसरात अवकाळीनं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीही जमा झालाय. सिंहगड रोड तळजाई टेकडी याठिकाणी गारपीट झाली. रस्त्याची कामं न झाल्यामुळं अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याचं पाहायला मिळालं. या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजानं नजरा वळवल्या.  

राज्याच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज 

ढगांचा गडगडाटासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागांत सोमवारीही पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर, गोव्यातही काहीशी अशीच परिस्थिती असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, विदर्भात मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी असेल असंही सांगण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : Unseasonal Rain : जीवघेणा पाऊस; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

 

तिथे देशाच्या दक्षिणेकडे, म्हणजेच तेलंगणा, पुदुच्चेरी या भागामध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यमत स्वरुपातील पावसाच्या सरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणताना दिसतील. तर, ओडिशा, झारखंड आणि हिमालयाच्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या सिक्कीमलाही पावसाचा तडाखा बसेल. 

कमाल तापमानात वाढ? 

आयएमडीच्या वृत्तानुसार पुढील 3 ते 5 दिवसांमध्ये हिमालयाचा पश्चिम भाग आणि त्यालगत येणारा भाग आणि पूर्वोत्तर भारत वगळता देशातील इतर राज्यांमध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ होणार आहे. तापमानवाढ होणार असली तरीही किमान पुढील पाच दिवस तरी देशात उष्णतेच्या लाटेची चिन्हं नाहीत असंही आयएमडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

येत्या काळात देशामध्ये हवामान कोरडंच राहील. साधारणत: कोणत्याही पट्ट्यामध्ये चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण होणार नाही, ज्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरेल. बहुतांश भागांमध्ये तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.