Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची ये- जा सुरु असतानाच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीनं चाहूल दिली आहे. हवामान विभाग मात्र वेगळात इशारा देताना दिसतोय...   

सायली पाटील | Updated: Nov 15, 2023, 11:39 AM IST
Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल  title=
Maharashtra weather IMD Rainfall Prediction latest update

Maharashtra Weather : भारतीय हवमानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात पावसाचा नवा टप्पा सुरु होण्याची चिन्हं आहेत. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर, काही भागांमध्ये पावसाच्या सरीही बरसण्याची शक्यता आहे. 

तिथं कोकण किनारपट्टी, गोवा आणि लगतच्या दक्षिण भारत पट्ट्यामध्येही पावसाची हजेरी असेल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये मात्र हवामान कोरडं राहणार असून, इथं किमान तापमानात काही 2 अंशांची घट पाहायला मिळू शकते. 

अचानक कुठून आला हा पाऊस? 

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार 16 नोव्हेंबरपर्यंत पश्चिम वायव्य दिशेकडे सरकणारा बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार आहे. याचे परिणाम मागील 24 तासांमध्ये केरळ, तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाले आहेत. येत्या काळातही या राज्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पावसाची वातावरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळं अवकाळीचं सावट शंभर टक्के टळलं असं आता म्हणता येणार नाही. 

हेसुद्धआ वाचा : ऐन दिवाळीत नोकरीवर गदा; 'या' बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ 

देशाच्या उत्तरेकडील राज्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान या भागांमध्ये सहसा सध्याच्या सुमारास कडाक्याची थंडी पडते. पण, अचानकच इथं किमान तापमानाच पाच अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. पण, केदारनाथ परिसर मात्र याला अपवाद ठरतोय, कारण इथं बर्फवृष्टी सुरुच आहे. राज्यातील उर्वरित भगामध्ये मात्र हवामान कोरडं आहे. 

हवामानाची स्थिती स्थिर राहिल्यास 16 नोव्हेंबरनंतर पश्चिम आणि उत्तर भारतात पुन्हा एकदा काही पर्वतीय भागांसह हिमाचल आणि उत्तराखंडच्या मैदानी भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसू शकतात. त्यामुळं तापमानातही काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं तुम्ही उत्तरेकडील राज्यांमध्ये जाणार असाल, तर काळजी घ्या. कारण इथं तुम्हाला कोणत्याही ऋतूचा सामना करावा लागू शकतो.