Maharashtra weather forecast : देशातील अरबी समुद्राच्या पट्ट्यावर घोंगावणारं बिपरजॉय हे वादळ सध्या रौद्र रुपात असून, या चक्रिवादळाचे परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या इतरही काही भागांवर होताना दिसत आहेत. मुंबईपासून 720 किंवा त्याहून कमी अंतरावर दक्षिण पश्चिमेला हे वादळ असल्याचं म्हटलं जात आहे. पुढील 36 तासांमध्ये या वादळाचं रुप आणखी रौद्र होणार असल्याचा इशारा हवामानशास्र विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र पट्ट्यामध्ये काही भागांत पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर शनिवार रविवारच्या सुट्ट्यांसह पुढील दोन दिवस म्हणजेच एकूण येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील तापमानाचा आकडा वाढणार आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात येत्या दिवसांमध्ये वाढ नोंदवली जाऊ शकते.
थोडक्यात सकाळच्या वेळी ऊन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा, तर संध्याकाळच्या वेळी पाऊसधारा असंच काहीसं वातावरण पाहायला मिळणार आहे. किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे वादळी वारे पाहता सध्या मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी मान्सूनचा मुख्य मुहूर्त चुकला पण, उशिरानं का असेना हा मान्सून केरळात दाखल झाला आणि महाराष्ट्राच्या दिशेनंही त्याची वाटचाल सुरु झाली. सध्याच्या घडीला चक्रिवादळी वाऱ्यांमुळं मान्सूनच्या वेगावर त्याचे परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात मान्सून 13 जूनपर्यंत दाखल होईल असा इशारा देण्यात आला आहे. तत्पूर्वी वाढत्या उकाड्यासोबतच राज्याच्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात काही अंशी पावसाची बरसातही होणार आहे. पण हा मान्सून नसून पूर्वमोसमी पाऊस असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
'स्कायमेट' या खासगी संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये अंदमान निकोबार, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिथं तामिळनाडू, कर्नाटक प्रांतातही पावसाची हजेरी असेल. तर, उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्येही धुळीच्या वादळासोबतच पावसामुळं नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. थोडक्यात तुम्ही येत्या चार ते पाच दिवसांसाठी घराबाहेर पडणार असाल, परराज्यात जाणार असाल तर ऊन आणि पावसाच्या तयारीनिशी बाहेर पडा.