Maharashtra Weather Forcast : सावध व्हा, सुट्टीला घरातच राहा; राज्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार

Maharashtra Weather Forcast : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कमी जास्त प्रमाणात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसानं आता काहीशी उसंत घेतली असली तरीही तो पूर्णपणे परतलेला नाही. काय आहे येत्या काळासाठीचं हवामान वृत्त? पाहा...   

सायली पाटील | Updated: May 13, 2023, 07:21 AM IST
Maharashtra Weather Forcast : सावध व्हा, सुट्टीला घरातच राहा; राज्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार  title=
Maharashtra Weather forcast latest news heat wave cycone mocha latest update

Maharashtra Weather Forcast News : तिथे बंगालच्या उपसागराध्ये मोका चक्रिवादळानं थैमान घालण्यास सुरुवात केलेली असताना त्याचे परिणआम देशाच्या काही भागांमध्ये दिसून येत आहेत. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला या चक्रिवादळाचा धोका नसून, उलटपक्षी राज्यात सध्या हवामान बदलाचं पर्व सुरु झाल्याचं लक्षात येत आहे. थोडक्यात राज्यात तापमानवाढीस सुरुवात झाली असून, काही भागांतून अवकाळी पावसाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढचे पाच दिवस राज्यातील उकाडा वाढणार आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढणार आहे. म्हणजेच या आठवड्याची अखेर आणि नव्या आठवड्याची सुरुवात ही उन्हाच्या झळा सोसतच होणार आहे हे आता स्पष्ट होत आहे. तिथं मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याचा इशारा असला तरीही मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागाला मात्र उष्णता वाढल्यामुळं दिवसातून काही तास अवकाळीचा मारा सहन करावा लागणार आहे. तुलनेनं कोकण आणि गोव्या नजीकचा भाग मात्र कोरडा राहील. 

हवामान विभागानं जळगाव, नंदुरबार, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिक या भागांमध्ये शनिवारी तापमान उच्चांग गाठेल असा अंदाज वर्तला. शुक्रवारी विदर्भात सर्वत्र पारा चाळीशीपार गेल्याचं पाहायला मिळालं, जिथं अकोल्यात तापमान 44.5 अंशांवर पोहोचलं होतं. उन्हाचा वाढणारा दाह पाहता नागरिकांना प्राथमिक स्तरावर काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : सत्तासंघर्षामुळे आघाडीत संघर्ष, ठाकरे सरकार कुणाच्या चुकीमुळे पडलं?

शिवाय सकाळ आणि दुपारच्या वेळेत उन्हाच्या झळा वाढतच चालल्यामुळं शक्यतो घराबाहेर पडणं टाळा असाही इशारा देण्यात येत आहे. परिणामी शनिवार रविवारी सुट्टी असली तरीही या उन्हाची दाहकता पाहता कुठं बाहेर फिरस्तीसाठी निघण्याऐवजी घरात राहूनच सुट्टीचा आनंद घ्या असं अवाहन करण्यात येत आहे. 

राज्यातील तापमानानं ओलांडली चाळीशी 

पुणे 40.8°C
बारामती 40.2 °C
सातारा 40.2°C
बीड 42.6 °C
परभणी 43.6°C
सोलापूर 41.2°C
नांदेड 42.8°C
जालना 43°C
धाराशिव 41.1°C
जळगाव 44.9°C

'त्या' वादळाचं काय झालं? 

बंगालच्या उपसागरात उसळेल्या चक्रिवादळाची तीव्रता सातत्यानं वाढत असून आता त्याच्या सावधगिरीचा इशारा 4 वरून 8 पर्यंत पोहोचला आहे. ज्यामुळं बांगलादेशातील तीन बंदरं आणि 12 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्याच्या घडीला हे वादळ पोस्ट ब्लेअरमधील 520 किमी पश्चिम उत्तर पश्चिमेला, कॉक्स बाजार (बंगलादेश) पासून दक्षिण दक्षिण पश्चिम आणि म्यानमारपासून 930 किमी दक्षिण दक्षिण पश्चिम दिसेला केंद्रित असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या वादळाच्या पाश्वभूमीवर या भागांमध्ये किनारपट्टी प्रदेशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, यंत्रणा आणि बचावपथकंही प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे.