Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत संपण्याच्या आधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 27, 2024, 10:47 AM IST
Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान? title=
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपत आहे

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर हरिणायामधील विधानसभा 3 नोव्हेंबर रोजी विसर्जित होत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या निवडणूक एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात. म्हणजेच राज्यात दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

..म्हणून दिवाळीआधीच निवडणुकांची शक्यता अधिक

विधानसभेच्या विसर्जनाच्या नियमाप्रमाणे मुदत संपण्याआधी किंवा मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते. म्हणजेच सध्याच्या स्थितीमध्ये हरियाणात कितीही उशीरा निवडणूक घेतली तर विधानसभा 4 नोव्हेंबरआधी अस्तित्वात येणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये 27 नोव्हेंबर ही नव्या विधानसभेच्या स्थापनेची 'डेडलाइन' असेल. 2009 सालापासून महाराष्ट्र आणि हरिणायातील विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातात. दोन्ही विधानसभांमधील अंतर केवळ 23 दिवसांचं असल्याने नियमानुसार आणि निवडणुकीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने दोन्ही निवडणुका एकत्र घेणं अधिक संयुक्त ठरणार आहे. प्रचार, उमेदवारी अर्ज, सभा यासाऱ्याचा विचार करता सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. ही गोष्ट लक्षात घेतल्यास यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान असून हरियाणाबरोबर निवडणूक घ्यायची झाल्यास ती 29 ऑक्टोबर आधीच घ्यावी लागेल. 

मतदान 'या' तारखांना होण्याची दाट शक्यता

खरं तर 27 नोव्हेंबर या अंतिम तारखेचा आणि दिवाळीनंतरचा कालावधी बराच आहे. तरीही हरियाणामधील नवीन विधानसभा 4 नोव्हेंबरपर्यंत स्थापन करणे आवश्यक असल्याने आणि दोन्ही राज्यांच्या निवडणुका केवळ 23 दिवसांच्या अंतरामधील काळात घेणं शक्य नसल्याने महाराष्ट्रातील निवडणूक दिवाळीच्या आधीच होण्याची शक्यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी 21 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरदरम्यान विधानसभेची निवडणुकीसाठी मतदान होऊ शकतं असं सांगितलं जात आहे. सध्याच्या विधानसभेसाठी 2019 मध्ये 21 ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं.

पक्षांनी सुरु केली तयारी

दिवाळीपूर्वीच निवडणूक होण्याची शक्यता अधिक असल्याने राजकीय पक्षांनाही तयारीला सुरुवात केली आहे. युती, आघाडीच्या चर्चा पडद्यामागे सुरु झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आज (27 मे 2024 रोजी) मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व खासदार, आमदार आणि पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या, निवडणुकीबाबत ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसंच या बैठकीत काही पक्ष प्रवेश देखील होतील असं सांगितलं जात आहे.