'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..'

Pune Porsche Accident Ajit Pawar: "पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे," असा खोचक टोला ठाकरे गटाने पुण्याच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 27, 2024, 10:06 AM IST
'अजित पवार पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'पोर्शे अपघातानंतर..' title=
ठाकरे गटाची टीका

Pune Porsche Accident Ajit Pawar: पुण्यामधील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कारच्या भीषण अपघातामध्ये दोघांना प्राण गमवावा लागल्यानंतर रोज या अपघातासंदर्भात नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आज या प्रकरणामध्ये अपघाताच्या वेळी कार चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. एकीककडे या प्रकरणी रोज नवे खुलासे होत असतानाच दुसरीकडे या प्रकरणावरुन राजकारणी चांगलेच तापले आहे. सदर प्रकरणानंतर जवळपास सहा दिवसांनी प्रसारमाध्यमांना पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली. यावरुनच आता उद्धव ठाकरे गटाने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

सहा दिवस का घेतले?

देशभरात चर्चेचा विषय असलेल्या पोर्शे अपघात प्रकरणानंतर अजित पवार आठवडाभर 'नॉट रिचेलबल' होते, असं म्हणत ठाकरे गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. "पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही नेहमीप्रमाणे गायब म्हणजे ‘नॉट रिचेबल’ होते. हा त्यांचा आवडीचा छंद आहे. “मी पुण्याचा पालकमंत्री आहे व मी सांगेन तेच होईल,’’ असा सुका दम देणाऱ्या अजित पवारांनी या (पोर्शे) अपघातानंतर संवेदना व्यक्त करणे सोडाच, पण दोन ओळींचे निषेधपत्रही काढले नव्हते. आता दुर्घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. "‘कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी कारवाई होणारच,’ असे ते म्हणाले. मात्र ‘च’वर जोर देऊन हे सांगायला त्यांनी सहा दिवस का घेतले? या प्रकरणात अगदी सुरुवातीपासून राजकीय हस्तक्षेप दिसून आला असताना असा कुठलाही प्रकार नाही, असा निर्वाळा पुण्याचे पालकमंत्री सहा दिवसांनी का देत आहेत? पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपले लक्ष आहे असा खुलासा करायला त्यांना एक आठवडा लागला यातच सगळे आले," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावला आहे.

आमदार टिंगरेंवरुनही हल्लाबोल

अजित पवार गटाचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी 19 मे रोजी हा अपघात झाल्यानंतर तातडीने पोलीस स्टेशनला जाऊन प्रकरणाची माहिती घेतल्याचा दावा केला आहे. मात्र यावरुनच आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून अजित पवार गटावर निशाणा साधण्यात आला आहे. "अग्रवालने आतापर्यंत कोणाला किती चंदा दिला व त्यामुळे पुण्यातील अनेक टिंगे-व-टिंगरे अग्रवालच्या बचावासाठी कसे निर्लज्जपणे पुढे सरसावले आहेत ते आता दिसत आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'पुण्याचे पोलीस आयुक्त फडणवीस टोळीचे हस्तक असून..', ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, 'अग्रवालने कोणाला..'

अजित पवारांसारखे लोक पुण्याला लागलेल्या वाळवीचे किडे

"भाजप व अजित पवारांचे सर्व घाशीराम या प्रश्नी तोंड शिवून बसले असताना धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले व एका बेवड्या श्रीमंताने केलेले दोन खून सहज पचवले जाऊ नयेत म्हणून ते उभे ठाकले आहेत. पुण्याला वाळवी लागली आहे व अजित पवारांसारखे लोक त्या वाळवीचे किडे आहेत. पुण्यात बिल्डरांचे राज्य त्यांनीच निर्माण केले. बेकायदेशीर जमीन व्यवहार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण दिले. गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांना ‘मोक्का’सारख्या कारवाईतून वाचवले. अग्रवालसारख्या बिल्डरांच्या रक्षणासाठी ‘टिंगे’ आणि ‘टिंगरे’ टोळ्या निर्माण केल्या व त्याकामी पोलीस यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता हे त्याच यंत्रणेचा एक भाग असून ते या वाळवीचे चौकीदार व वसुलीप्रमुख आहेत काय अशी शंका नव्हे, आता खात्रीच पटली," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

आज मुंबईत अजित पवार गटाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आज (27 मे 2024 रोजी) मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व खासदार, आमदार आणि पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या, निवडणुकीबाबत ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसंच या बैठकीत काही पक्ष प्रवेश देखील होतील. प्रामुख्याने या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धीरज शर्मा यांचाही पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.