राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी

Maharashtra Unseasonal Rain : मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला.  अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 28, 2023, 11:32 AM IST
राज्यात पुणे, लातूर आणि अमरावती जिल्ह्याला पावसाने झोडपले, तिघांचे बळी title=

Maharashtra Unseasonal Rain : पुणे आणि लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्याला गारपिटीचा तडका बसला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात बुधवारी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसानेचे तीन बळी गेले असून एक मजूर जखमी झाला आहे. चहार्डी गावात वीज पडून नऊ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्यात.

विदर्भात गारपिटीचा इशारा

मुंबईसह राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आजही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा, कोकणात अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता आहे. मुंबईतही काल ढगाळ वातावरण होतं. मुंबईलाही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईवर आजही मळभ कायम आहे. राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे तापमानात घट झालीय. 40 ते 43 अंशांवर गेलेलं तापमान सध्या 36 ते 37 अंशांवर आलंय. मुंबईत 33 अंशांवर तापमान आले आहे.

लातूरमध्ये गारांचा पाऊस

लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. गारपिटीमुळे काही क्षणातच घोणसी परिसर अक्षरशः बर्फाळ झाला. उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या समोर तळ्याचं स्वरूप आलं होतं. जळकोट तालुक्यातील घोणसी, बोरगाव, एकुर्का, रामपूर तांडा, आशा अनेक भागात कालपासून तुफान वादळी वाऱ्याचा तडाखा बसतोय. घोणसीमध्ये एवढ्या गारा पडल्या की अक्षरशः काही क्षणात परिसर काश्मीरसारखा दिसू लागला. घरांवर, रस्त्यावर गारांचा खच पडला होता. 

अमरावती जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जिल्ह्याला गारपिटीचा तडका बसला असून धारणी येथे युवराज धांडे या व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला तर धामणगाव रेल्वे तालुक्यात वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला, तर 2 मेपर्यंत असाच अवकाळी पाऊस पडणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

दरम्यान वरुड तालुक्यात काल सायंकाळी बेनोडा, खडका, जामगाव, बारगाव, माणिकपूर, धामणदस, पळसोना आदी गावांत जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने ऐन उन्हाळ्यात नद्या-ओढ्यांना पूर आला होता. खडका गावातून वाहणाऱ्या कुंड नदीला महापूर आल्याने तब्बल दोन तास गावाचा महामार्गाशी संपर्क तुटला होता. सध्या या अवकाळीने कोबी ऊस, तीळ आणि कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात या चाळीस दिवसाच्या कालावधीत सात वेळा जिल्ह्यात गारपीट झाली आहे त्यामुळे जवळपास 5 हजार हेक्टर शेती पिकांचं नुकसान झाले यात जवळपास 2 कोटी 76  लाख कोटीवर नुकसान आहे.

चिंचोली येथे वादळी वाऱ्याचे दोन बळी

चोपडा तालुक्यात वीज पडून सात मेंढ्या ठार तर मेंढपाळ जखमी झाला. जळगाव जिल्ह्यात बुधवारी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला असून वादळी वारा गारपीट व अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 

वादळी वाऱ्यामुळे चिंचोली येथे उभा कंटेनर पलटी झाल्याने या कंटेनर खाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर जखमी झाला आहे तर चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात वीज पडून नऊ मेंढ्या ठार झाल्या असून मेंढपाळ जखमी झाला आहे. तर केळी पिकासह रब्बी पिकाचे देखील मोठे नुकसान झाले असून शेकडे हेक्टर वरील पिके ही आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.