पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांकडून आणखी दोन व्यक्तींची हत्या

पंधरा दिवसांमध्ये सातवी हत्या 

Updated: Feb 2, 2019, 01:22 PM IST
पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांकडून आणखी दोन व्यक्तींची हत्या title=

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्यां हल्ल्याने पुन्हा एकदा गडचिरोलीमध्ये दोघांचा बळी गेल्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुन त्यांना या नक्षलवाद्यांनी संपवल्याचं कळत आहे. हत्या करुन नजीकच्याच गावामध्ये त्यांचे मृतदेह फेकत पुन्हा एकदा दहशतीचा क्रूर चेहरा समोर आला आहे. कुरखेडा भागात राहणाऱ्या दोघांना शुक्रवारी नक्षलवादी घेऊन गेले होते, ज्यानंतर आता थेट त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली आहे. 

'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अतिरिक्त पोलीस अधिक्षक महेंद्र पांडी  यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या प्रकरणीचा तपास सुरु आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांमध्ये अशा प्रकारे हत्या करण्यात येण्याची ही सातवी घटना असल्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांचच लक्ष वेधलं आहे. 

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कसनसूर गावातील तीन गावकऱ्यांना यापूर्वी अशाच प्रकारे मारण्यात आलं होतं. सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा आणखी दोन व्यक्तींवर नक्षलवाद्यांनी  हल्ला केला. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरुनच नक्षलवादी या कारवाया करत असल्याचं उघड होत आहे.