Shukracharya Mandir: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे. राज्यातील विविध भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. तुम्हाला देव-दानव आणि त्यांच्यातील युद्धाबाबत माहिती असेलच. देवांचे गुरू होते बृहस्पती तर दैत्याचे गुरू शुक्राचार्य होते, अशी पुराणात नोंद आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे. दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात शुक्राचार्यांचे एकमेव मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरू शुक्राचार्य मंदिरात शुभकार्य, विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदिर आहे, अशी मान्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (बेट) हे गुरु शुक्रांचे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी त्यांनी तप व वास्तव्य केला आहे. या भूमीवर त्यांचा आश्रम होता, अशी नोंद इतिहासात सापडते. दैत्य गुरू शुक्राचार्य हे महर्षी भृगु यांचे पुत्र तर ब्रह्मदेवांचे नातू होते. देव-दानवांच्या युद्धांत दैत्यांना मार्गदर्शन केले. शुक्राचार्य यांनी महादेव यांना प्रसन्न करुन संजीवनी मंत्र प्राप्त केला होता. या संजीवनी मंत्रांने ते दैत्यांना पुन्हा जिवंत करत असतं. हे पाहून देवांनी बृहस्पतीपुत्र कच याला शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. जिथे कच यांने संजीवनी विद्याप्राप्त केली ते स्थान म्हणजे शुक्राचार्य मंदिर होय.
गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांची समाधी मंदिर आहे. या गुरू शुक्राचार्य मंदिरात शुभकार्य, विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदिर आहे. अगदी सिंहस्थ काळ असला तरीही येथे लग्न लागतात. आजही या मंदिरात मुहूर्त वेळ-नक्षत्र यांचे कोणतेही दोष न लागता बाराही महिने विवाह सोहळे होतात.
शुक्राचार्यांच्या मंदिरातसमोर पेशव्यांनी वाडय़ाच्या अवशेषातून देवळाच्या ओवऱ्या पूर्वी बांधलेल्या असून समोर विष्णू, गणपती यांची मंदिरे आहेत. दोन्ही मंदिरांच्या मध्यात संजीवनी पार उत्तरपूर्वेस कच देवाचे मंदिर असून संजीवनी मंत्र देतेवेळी भगवान शंकर (त्रंबकेश्वर) येथे गुप्त रूपाने आले असे मानले जात असल्याने प्रतित्रंबकेश्वराचे मंदिर येथे आहे. महाशिवरात्रीच्या काळात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
शिर्डी साईबाबा मंदिरापासून नगर-मनमाड महामार्गावर हे बेट कोपरगाव स्थान 15 किलोमीटर अंतरावर आहे. शिर्डी येथे गेल्यास जवळच असलेल्या दैत्य गुरू , शुक्राचार्य यांचे समाधी मंदिरास अवश्य भेट द्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)