महाराष्ट्राच्या 'या' गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ

Maharashtra Tourism: सातारा शेरी लिंब येथील बारा मोटीची विहीर ही स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या विहिरीची खासियत जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 15, 2024, 06:58 PM IST
महाराष्ट्राच्या 'या' गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ title=
maharashtra tourism places to visit baramotichi vihir in satara

Maharashtra Tourism: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायाच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आहेत. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारी अनेक ठिकाणे आहेत. सातारा या शहरालाही ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते. जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. साताऱ्यातच एक प्रेक्षणीय स्थळ आहे. शिवकालीन स्थापत्य शैलीचा अद्भूत नमूना पाहायला मिळतो. एका विहरीत बांधलेला राजवाडा? जाणून घेऊया या स्थळाची संपूर्ण माहिती. 

साताऱ्यातील शेरी लिंब येथे 'बारामोटेची विहीर' आहे. सुमारे 300 वर्ष प्राचीन असलेली ही विहीर प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ आहे. इ.स.वी सन 1719 ते 1724 या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी विरुबाई यांनी ही विहीर बांधल्याचे सांगितले जाते. या विहिरीची खोली जवळपास 100 फूट खोल आणि 50 फुट रुंद अशी आहे. असं म्हणतात की, विहीरीचे बांधकाम करताना त्याच परिसरात 330 आंब्याची कलमं लावून आमराई तयार करुन घेण्यात आली. 

बारामोटेची विहीर फक्त विहीर नसून खरं तक एक राजवाडा आहे. या विहीरीचे सर्व बांधकाम हेमाडपंथी आहे. विहीराच्या दगडात कोरीव शिल्प कोरण्यात आले आहे. या विहिरीकडे पाहिल्यावर ही विहीर आहे की राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. विहिरीत उतारण्यासाठी दगडात कोरण्यत आलेला जिना आणि भरभक्कम दरवाजा. तर विहिरीच्या मध्यमागी दोन मजली महाल आहे. या विहिरीचा आकार साधारण शिवलिंगाप्रमाणे आहे, असं सांगण्यात येते. 

विहिरीचा आकार अष्टकोनी आहे. अलिशान जिना उतरुन खाली महालाच्या तळमजल्यावर पोहोचतो. तर, महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाडादेखील आहेत. जिन्याने वर जाताच एका छोटेखानी महालात आपण येवून पोहोचतो. विहिरीच्या आत असलेल्या मुख्य दरवाजाकडून आत येताच थेट छतावर जातो. तिथे सिंहासन आणि बैठक व्यवस्था असलेली नजरेस पडते. सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत, असं सांगण्यात येते. 

शाहु महाराजांबरोबरच पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक गुप्त बैठकींची साक्ष असणारी ही विहीर आहे. भिंतीवर कोरलेल्या  वाघ आणि सिंहाची शिल्पे ही पराक्रमाचे प्रतीक दर्शवतात. 

कसं जालं?

सातारा शहरातील लिंब गावात स्थानिक बस किंवा खासगी वाहनाने येता येते. गावात आल्यानंतर रिक्षा, जीप अशा वाहनांनी विहिरीवर पोहोचता येते.