बजरंगबली हनुमानाच्या पायाचा ठसा असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण, पण जायचं कसं?

Lord Hanuman Birth Place: महाबली हनुमानाचे जन्मस्थळ कोणते हे तुम्हाला माहितीये का? आपल्या महाराष्ट्रातच हे स्थळ आहे. एका पर्वतावर अजूनही हनुमानाच्या अस्तित्वाचे ठसे आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 7, 2024, 06:34 PM IST
बजरंगबली हनुमानाच्या पायाचा ठसा असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण, पण जायचं कसं? title=
maharashtra tourism Lord Hanuman was born in nashik Anjanadri hills

Lord Hanuman Birth Place: श्रीराम हनुमानाचे भक्त हनुमान यांचे जन्मस्थान नाशिकमध्ये आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. नाशिकडून त्र्यंबकेश्वरकडे जाताना दिसणाऱ्या पर्वतरांगामध्ये अंजनेरी नावाचा पर्वत आहे. हेच महाबली हनुमानाचे जन्मस्थळ असल्याच्या नोंदी सापडतात. अंजनेरी पर्वतावर हनुमानाचे जन्मस्थान असलेले अजंनीमाता मंदिरदेखील आहे. ट्रेकिंग आणि भाविक मोठ्या संख्येने या पर्वताला भेट देतात. 

माता अंजनीच्या नावावरुन या पर्वताला अंजनेरी नाव असं पडले. तर पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावालाही अंजनेरी म्हणतात. गावात अजूनही कौलारु घरं आपले साधेपण टिकवून आहे. अंजनेरी पर्वताकडे जाण्यासाठी वनविभागाने सोय केली आहे. अंजनेरी परिसरात जैन धर्मियांची लेणीदेखील आहेत. त्यामुळं जैन परंपरेत या परिसराला श्वेतप्रद असंही म्हणतात. अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. जवळपास 16 मंदिरे असून 12 जैन व 4 हिंदू मंदिरे आहेत. 

अंजनेरी पर्वतावर जाताना तलाव, दोन मंदिरे, पाण्याची कुंडे, गुफा हे स्थळे लागतात. तर, पर्वताच्या टोकावर अंजनीमाता मंदिर आहे. इतकंच नव्हे तर अंजनेरी पर्वतासंदर्भात एक आख्यायिकादेखील सांगितले जाते. बाल हनुमानेने केलल्या करामतीचा साक्षीदार हा पर्वत आहे. बाल हनुमानाने सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी पहिले उड्डाण याच पर्वतावरून केल्याची अख्यायिका आहे. तर, पर्वतावर एक तलाव आहे त्या तलावाचा आकार पायाच्या ठसाप्रमाणे आहे. हा बजरंगबली हनुमानाच्या पायाचा ठसा असल्याचे सांगण्यात येते. असं म्हणतात की जेव्हा बालहनुमानाने सूर्याकडे झेप घेतली तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा पर्वतावर उमटला. त्याठिकाणी आता तळे निर्माण झाले आहे. या तळ्यातील पाण्याचा स्पर्श करणे म्हणजे हनुमानाच्या चरणाला स्पर्श करण्याचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. 

अंजनेरी पर्वताचा ऐतिहासिक व पौराणिम वारसा लाभला असून नैसर्गिंक साधन-संपत्तीदेखील लाभली आहे. अनेक औषधी वनस्पती गडावर आढळतात. वन विभागाकडून यावर संशोधनदेखील सुरू आहे. पर्वतावर 350हून अधिक औषधी वनस्पती आहेत. सेरोपेजिया अंजनेरिका ही दुर्मिळ वनस्पती फक्त अंजनेरी पर्वतावरच आढळते. इतरत्र कुठेही सापडत नाही. 

कसं जायचं?

अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक 20 कि.मी अंतरावर अंजनेरी फाटा आहे. अंजनेरी गावातून गडावर जाता येते. नाशिकडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी कोणतीही लालपरी अंजनेरी फाट्यावर थांबते. संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी सहा ते सात तास लागतात. गडावर राहण्याची सुविधाही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र गडावर जेवणाची अद्याप कोणतीही सुविधा नाही.