२०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश

आंबेगाव तालुक्यातल्या एका गावात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. सुटकेसाठी सहा वर्षांचे बाळ जीवाच्या आकांतानं ओरडत होते. 

Updated: Feb 21, 2019, 08:21 PM IST
२०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश title=

पुणे : आंबेगाव तालुक्यातल्या एका गावात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. सुटकेसाठी सहा वर्षांचे बाळ जीवाच्या आकांतानं ओरडत होते. अख्खी रात्र त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. अवघ्या ६ वर्षांच्या रवीचा हा केविलवाणा आक्रोश सगळ्यांच्याच हृदयांना घरं पाडत होता. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या थोरांदळे गावात रवी बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमाराला बोअरवेलमध्ये पडला. आणि मग सुरू झाली रवीला वाचवण्याची धडपड. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढण्यात यश आले.

NDRF चे २५ जवान तातडीनं गावात पोहोचले. आतमधून रवीच्या बोलण्याचा आवाज येत होता. एनडीआरएफ खोदकाम करत तब्बल ११ तासांनी रवीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचले. रवीचा चेहरा दिसताच सगळ्यांच्या जीवात जीव आला. रवीला खायला देण्यात आले. पण रवीचा पाय खाली अडकला होता, त्यामुळे रवीला बाहेर काढता येत नव्हते. अखेर रवीच्या कंबरेपर्यंत खोदकाम करावे लागले.

एनडीआरएफच्या रात्रभर सुरू असलेल्या १६ तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर तो यशस्वी क्षण आला. रवीला बाहेर काढण्यात आले. रात्रभर बोअरवेलमध्ये अडकलेले लेकरू सुखरुप बाहेर आले. एनडीआरएफच्या जवानांसाठी टाळ्या वाजल्या, अश्रू ओघळले. छोट्या रवीची इच्छाशक्ती तीव्र होतीच, पण योग्य वेळेत जलद कारवाई करणाऱ्या प्रशासनाचे, एनडीआरएफचेही कौतुक. रवीची प्रकृती आता उत्तम आहे.