दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?

Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 27, 2024, 11:47 AM IST
दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा? title=
Maharashtra SSC 10th Results 2024 Live Updates MSBSHSE Declared ATKT facility for 10th students

Maharashtra SSC 10th Results 2024: दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील यंदाचा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. तर कोकण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.01 इतका लागला आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून 94.73 टक्के इतका लागला आहे. आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकालाबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ATKTही नवीन सुविधा सुरू करण्यात येत आहे. काय आहे ही सुविधा जाणून घेऊया. 

ATKT सुविधा

शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीची सुविधा निर्माण केली आहे. याचा फायदा जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांना होणार आहे. म्हणजेच दहावीचा विद्यार्थी एक किंवा दोन विषयात नापास झाला असेल तरी तो विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश घेऊ शकतो. या जूनमध्ये त्याला अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. मात्र, अकरावीचा निकाल लागण्यापूर्वी त्याने दहावीचे अनुत्तीर्ण राहिलेल्या एक किंवा दोन विषयात पास होणे गरजेचे आहे. या सुविधेमुळं विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. तसंच, शालेय शिक्षण मंडळाच्या या सुविधेमुळं या वर्षी 26 हजार विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यश शरद गोसावी यांनी दिली आहे. 

श्रेणीसुधार व गुणसुधार योजना

एखादा विद्यार्थी दहावी किंवा बारावीच्या परीक्षात पास जरी झाला असेल तरी त्याला एखाद्या विषयातील गुण वाढवण्यासाठी किंवा श्रेणी वाढवण्यासाठी तो पुन्हा श्रेणीसुधार व गुणसुधार योजनेसाठी परीक्षेला बसू शकतो. या दोन संधी जुलै 2024 आणि मार्च 2025 या दोन परीक्षेंमध्ये विद्यार्थी गुण वाढीसाठी परीक्षेला बसू शकतो, अशी माहितीही शरद गोसावी यांनी दिली आहे. 

दहावीचा निकाल काय लागला?

यंदा दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून 97.21 टक्के निकाल लागला आहे. तर, मुलांचा निकाल 94.56 टक्के इतका लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्कांनी अधिक आहे. 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर, राज्यात187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.