Maharashtra Rain : वारंवार उघडीप देणाऱ्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरण्यास सुरुवात केली असून, पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात तर पावसाची संततधार सुरुच आहे. पण, आता तो मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही चांगला जोर धरताना दिसेल. तर, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं राज्याच्या पश्चिमेला असणाऱ्या घाटमाथ्यावरील परिसरातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र सध्या पश्चिम बंगालच्या दिशेनं आल्याचं कळत असून, यामुळं महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याच्या क्षेत्राचा परिणाम आणखी तीव्र होणार असून, पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक असणार आहे. कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात या अंदाजाच्या धर्तीवर यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईतही बहुतांशी पावसाचे ढग शहरावर सावट आणताना दिसतील. तर, शहराच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळं नागरिकांनी पावसाच्या तयारीनिशी घराबाहेर पडावं आणि विशेष खबरदारी बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. तिथं कोकणात पावसानं पुन्हा जोर धरल्यामुळं शेतं पुन्हा बहरली असून, उर्वरित राज्यातही असंच चित्र पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल. सातारा आणि कोल्हापुरातही पावसाची जोरदार हजेरी असेल. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची दमदार उपस्थिती पाहायला मिळेल. पुढे 16 ते 17 सप्टेंबरदरम्यान पाऊस मध्य महाराष्ट्रात हजेरी लावेल. त्यामुळं या काळात शेतकरी सुखावणार हे नक्की.