Maharashtra Rain Updates : वीकेंडला पावसाचीच बॅटिंग; कोकण- विदर्भात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates : आठवड्याच्या शेवट अगदी समोर असतानाच आता अनेकांचेच आठवडी सुट्टीसाठी भटकंतीला निघण्याचे बत बनू लागले आहेत. अशा सर्व मंडळींसाठी हे हवामान वृत्त...   

सायली पाटील | Updated: Jul 7, 2023, 08:18 AM IST
Maharashtra Rain Updates : वीकेंडला  पावसाचीच बॅटिंग; कोकण- विदर्भात ऑरेंज अलर्ट  title=
Maharashtra Rain monsoon predictions latest updates news

Maharashtra Rain News  : महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सक्रिय झालेल्या मान्सूननं आता चांगलाच जोर धरण्यास सुरुवात केली असून, परिणामस्वरुप पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळीही वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचा काही भाग वगळता उर्वरित क्षेत्रांमध्ये सध्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली असून बळीराजासुद्धा सुखावला आहे. तूर्तास हा पाऊस काही विश्रांती घेणार नाहीये. कारण, हवामान विभागाच्या वृत्तानुसार पुढच्या 24 तासांसाठी विदर्भासह कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल, तर मुंबईसाठी पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट असेल. 

डोंगराळ भागावर वाढणार पावसाचा जोर 

कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्यानं मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, मराठवाड्यामध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. 

तिथं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शेती कामांना वेग आलाय. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे समाधानी असलेला बळीराजा लावणीच्या कामात व्यस्त झाला आहे. पाऊस तळकोकणात उशिराने दाखल झाला असला तरी सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

 

कसा सुरुये मान्सूनचा प्रवास? 

सध्या सक्रिय असणारा मान्सूनचा पट्टा राजस्थान येथील बिकानेरपासून सिधी, अंबिकापूर, बालासोरहून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर, तिथं दक्षिण गुजरातपासून थेट केरळापर्यंतही एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागानजीक समुद्रकिनारी भागात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; 'या' राज्यांमध्ये जाणं टाळाच 

कोणत्या भागाला कोणता अलर्ट? 

दरम्यान, सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जालना, परभणी, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, गोंदिया, चंद्रपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मात्र पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, नागरिक आणि प्रशासनांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. 

तलावक्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये सरासरी पाऊस सुरु असल्यामुळं सध्या तलावांमधअये 264657 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा जमला आहे. साधारण सात दिवसांमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 76 दिवसांचा पाणीपुरवठा जमला आहे. त्यामुळं शहरातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.