Maharashtra Politics : 2024 च्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकांसाठी वर्षभराचा कालावधी असूनही राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. 'इंडिया टुडे आणि सी व्होटर'नं (india today c voter survey) केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये सत्ताधारी भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) सरकारला धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावरुन आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व्हेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाने (Shinde Group) प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व्हेबद्दल बोलताना तो विश्वासार्ह नसल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्याविरोधात आहे, त्यामुळे तो त्यांना नको आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं, असे आव्हान दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
"मूळात ते आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना थोडी जरी नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा," असं आव्हान दीपक केसरकर यांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
"जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात, तेव्हा त्यांना ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्वे भाजपाच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण, महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्याविरोधात आहे. त्यामुळे तो त्यांना नको आहे. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेत साधारण 34 जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र, या जागा 40 ते 45 असतील. मुख्यमंत्री म्हणाले की महाविकास आघाडीला 4-5 जागा मिळाल्या तरी पुरे. माझं म्हणणं की त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा जरी वाचवली तरी पुरे आहे," असे संजय राऊत म्हणाले होते.