राज्यात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय. जालन्यातील अंतरवाली सराटेमध्ये मराठा आरक्षण आंदोलानासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी एल्गार पुकारलाय. तरदुसरीकडे संभाजीनगर जवळील वडीगोद्रीमध्ये ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले आहेत. या ओबीसी आंदोलनातून खळबळजनक आरोप करण्यात आलाय. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून त्यांचा बीडमध्ये पराभव झाला, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय. तर छगन भुजबळ यांनीही या आरोपाला दुजोरा दिलाय.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नयेत यासाठी लक्ष्मण हाके आणि वाघमारे उपोषणाला बसले होते. शनिवारी सरकारच्या शिष्टमंडळांनी हाकेंची भेट घेऊन त्यांना सरकारी पत्र दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. त्यावेळी करण्यात आलेल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव करण्यात आला. तर पंकजा मुंडेंनी कोणालाही विरोध केलेला नाही.
दुसरीकडे भुजबळ आणि मुंडे बहीण भावाला टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्णम हाके यांनी सडेतोड उत्तर दिलं. मी जातीयवाद केला नाही असे म्हणणाऱ्या जरांगे यांना हाकेंनी अनेक गोष्टींची आठवण करुन दिली.
'छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, महादेव जाणकर, मुंडे बहीण-भाऊ, वडेट्टीवार यांना राज्यातील जाती उपजातीसह 492 जातीची भाषा बोलता येते. जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलत आहात. मग नक्की जातीयवादी कोण? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे.'
खरं तर निवडणुकीत एका पक्षाची दुसऱ्या पक्षासोबत लढत असते. पण लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये मात्र मराठा विरुद्ध ओबीसी अशी पारंपरिक लढत पाहिला मिळाले. मतमोजणीच्या वेळी घडलेले नाट्य आणि त्यानंतर निर्माण झालेला तणाव अशात पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बीडमध्ये जातीयता भडकावली जात असल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा ओबीसी आंदोलनातून पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यात आला असा आरोप भुजबळांनी करुन नवीन वादाला तोंड फोडलंय.