अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद पेटला आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी खासदार कार्यालयाचं कुलूप तोडलं आहे. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि काही कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. दरम्यान खासदार कार्यालयाचा ताबा दिला जात नसल्याने यशोमती ठाकूर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. चावी दिली जात नसल्याने अखेर यशोमती ठाकूर यांनी कार्यालयात ताब्यात घेण्याचा इशारा देत कुलूप तोडलंय
भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव होऊनही त्यांनी कार्यालय न सोडल्याने यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी कुलूप तोडून नवनिर्वाचित खासदार बबळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्यासह प्रवेश केला. याआधी यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. आम्हाला हे सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे असंही त्या म्हणाल्या.
कार्यालयाचा ताबा देत नसल्याने यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. यावेळी तिथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना हे बरोबर नाही असं सांगत संताप व्यक्त केला. तसंच ही खासदारांशी वागण्याची पद्धत नाही सांगत अधिकाऱ्यांना जाब विचारला. गरीब व्यक्ती खासदार झाला म्हणून अशी वागणूक देता का? अशी विचारणाही त्यांनी केली.
आम्ही इतकी दादागिरी नाही केली, आम्ही तर तुम्हा अधिकाऱ्यांना मीटिंगमध्ये घेऊन बसत होतो अशी आठवण यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना करुन दिली. तुम्हाला आमच्यावर हवे तर गुन्हे दाखल करा. आम्ही तुम्हाला सांगून ऑफिस ताब्यात घेत आहोत असं त्यांनी चंद्रकांत पाटलांना सांगितलं.
"आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारे, संयम ठेवणारे लोक आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव असेल तर ते काय करणार? आमचं सर्टिफिकेट 3 तास उशिरा दिलं. खासदारांनी त्यांना महिन्याभरापूर्वी कार्यालय द्यावं यासाठी पत्र लिहिलं आहे. काल मागणी केली तर म्हणतात की, आता ते विभागलं असून राज्यसभेचा खासदारही येथेच बसणार. म्हणजे यांची इतकी दादागिरी, दडपशाही आहे. आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने निवडून आलो असून आमच्या खासदाराचा सन्मान राखला पाहिजे. आमच्याही मतदारसंघात लोक राहतात, जनावरं नाहीत. आम्ही लोकशाही मार्गाने कार्यालय ताब्यात घेतलं आहे," अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर दिली आहे.