'मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप?

Ajit Pawar : अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे म्हटलं जात आहे. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 22, 2023, 07:55 AM IST
'मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? title=

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज (22 जुलै) त्यांचा 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सामील होत उपमुख्यमंत्री पद मिळवलं आहे. अशातच अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. पुन्हा राजकीय समीकरणं बदलून मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक खळबळजनक ट्वीट केले आहे. 

'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' अशा कॅप्शनसह अमोल मिटकरी यांनी एक अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. "आपल्याला जी गोष्ट पटते लगेच त्यासाठी हो म्हणून टाकतो. परंतु कुणीही उठून सांगितली की माफी मागा. तर माफी मागायला मोकार नाही," असे अजित पवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

अजित पवार भावी मुख्यमंत्री - संजय राऊत

अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील, असे खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं आहे. "अजित पवार भावी आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील अथवा राजकीय असतील. परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं आहे की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल," असे संजय राऊत म्हणाले होते.

उद्धव ठाकरे अजित पवार यांची भेट

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एकनाथ शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. अजित पवार यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या आमदारांसह विधानभवनात दाखल झाले होते. "अजित पवार हे अडीच वर्षे माझ्या बरोबर होते. मला खात्री आहे की सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरु असले तरीही अजित पवारांकडून जनतेला मदत होईल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत परत त्यामुळे हे शक्य आहे," असे या भेटीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते.