उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्याप कायम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 21, 2024, 12:03 PM IST
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...' title=
(फोटो सौजन्य - PTI)

Uddhav Thackeray : सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद सुरु आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. हा वाद इतका वाढला आहे की काँग्रेसच्या विरोधानंतरही उद्धव ठाकरे सांगलीचा दौरा करणार आहेत. यासोबत उद्धव ठाकरे एका सभेला देखील संबोधित करणार आहेत. मात्र काँग्रेसकडून याला विरोध होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार घालण्याचे ठरवलं आहे.

सांगली लोकसभेच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमधला तणाव वाढला आहे. सांगली लोकसभा जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. या जागेवरून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. मात्र ठाकरे गटाने या जागेवरून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.  कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे, त्या बदल्यात सांगलीची जागा आम्हाला मिळावी, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. मात्र, काँग्रेस ही जागा ठाकरे गटाला देण्यास तयार नाही. यावरुन आता मोठा वाद सुरु झाला आहे.

दुसरीकडे, सांगली लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे आज जनसंवाद मेळाव्यातून लोकांशी संवाद साधणार आहेत. मात्र काँग्रेसने या जनसंवाद मेळाव्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. ठाकरे गटाने या मेळाव्यासाठी पाठवलेलं निमंत्रण देखील काँग्रेसने नाकारलं आहे. जागेचा तिढा सुटलेला नसताना मेळाव्याला स्थानिक काँग्रेस पक्षाची उपस्थिती योग्य नसल्याची भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी घेतली आहे.

सांगलीची जागा मिळायलाच हवी - संजय राऊत

"सांगली लोकसभेची जागा हवीच, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाम आहे. कोल्हापूरची हक्काची जागा मविआसाठी सोडली, त्यामुळे सांगलीची जागा मिळायलाच हवी असा आग्रह ठाकरे पक्षानं धरलाय. आम्ही काँग्रेसकडे राजस्थान, छत्तीसगड इथे जागा मागत नाहीये," असा चिमटा खासदार संजय राऊतांनी काढलाय.