Gram Panchayat Elections : राज्यातील 2353 ग्रामपंचातीसाठी आज मतदान पार पडत आहे. बारामतीच्या काटेवाडीतही मतदानाला सुरुतावत झाली आहे. यावेळी मतदानासाठी अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांसोबत बोलताना अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली आहे. बारामतीच्या काटेवाडीत आशा पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पहिल मतदान आशा पवार यांनीच केले. यावेळी बोलताना त्यांनी ही इच्छा व्यक्त करुन दाखवली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आशा पवार यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं होतं. राजकारणापासून दूर असणाऱ्या आशा पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. माझ्या लेकानं डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं असे आशा पवार यांनी म्हटलं आहे.
"अजित पवार आजारी असल्यामुळे मतदानासाठी येऊ शकले नाहीत. अशक्तपणा आला आहे. 1957 सालापासून मी मतदान करत आहे. काटेवाडीतील लोकांचा मतदानासाठी प्रतिसाद छान आहे. सुरुवातीचं पहिलं मत मी दिलं आहे. अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय 86 आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा आहे. कुणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही. लोक पण अजित पवार यांच्यावर प्रेम करतात. आता पाहुयात," असे आशा पवार म्हणाल्या.
दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजित पवार गटाकडून सातत्याने ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने केला जात आहे. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांनीही व्यक्त केली होती. तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. वेळ येईल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. तसेच अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांचं अभिनंदन करायला पहिला हार घेऊन मी जाईन, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या मातोश्रींची कधी पूर्ण होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष्य लागलं आहे.