Maharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Maharashtra Political News :  विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ( Supreme Court) नेण्यात आलं.  ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे. 

Updated: Mar 21, 2023, 11:41 AM IST
Maharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी title=

Maharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. सरकार बदलल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी यादी पाठवली आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) दिलेली यादी बदलण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नेण्यात आलं. विधानपरिषद आमदार नियुक्तीवर कोर्टाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे. तर उद्धव ठाकरे सरकारने दिलेली मूळ यादी कायम ठेवावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

12 आमदार नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आघाडी सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली होती. मात्र, शेवटपर्यंत कोश्यारी यांनी नावांना मान्यता दिली नाही.  महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे.  (Political News) राज्यपाल नियुक्त 12  आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. 

विधानपरिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 इतकी आहे. त्यापैकी 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर करतात. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदार नियुक्तीसंदर्भात पावले उचलली नाही. कोश्यारी पायउतार झाल्यानंतर आता दुसरे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न कायम आहे.

दरम्यान,  महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यात मागील अडीच वर्षात सततचा वाद दिसून आला होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सातत्याने टीका केली. तरीही तत्कालीन राज्यपालांनी शेवटपर्यंत नावे मंजूर केली नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झालयानंतर त्यांच्याकडून नवीन नावांची यादी देण्यात आली. मात्र, सुप्रीम कोर्टाकडून आधीच स्थगिती दिल्याने हा वाद कायम आहे.  मात्र, आता नव्या सरकारकडून राज्यपाल (Governor) नियुक्त 12 आमदारांची नावं नव्यानं पाठवली जाणार असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.