पोलीसदादा तुम्हीसुद्धा? बदल्यांसाठी पोलिसांचाच झोल, अशी झाली पोलखोल

झी 24तासच्या बातमीनंतर आरोग्य विभागाला जाग, अर्जदारांविरोधात गुन्हा दाखल  

Updated: Sep 15, 2022, 02:12 PM IST
पोलीसदादा तुम्हीसुद्धा? बदल्यांसाठी पोलिसांचाच झोल, अशी झाली पोलखोल title=

Police Transfers : नाशिकमध्ये (Nashik) बदली करून घेण्यासाठी चक्क पोलिसांनीच (Maharashtra Police) खोटी मेडिकल सर्टिफिकेट (Medical Certificate) सादर केल्याचं उघड झालंय. नातेवाईकांच्या गंभीर आजारांसह शस्त्रक्रियांचं बनावट सर्टिफिकेट सादर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या साखळीत नाशिक आणि धुळे जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि खासगी डॉक्टरांचाही समावेश असल्याचं उघड झालंय.

या घोटाळ्यात संशय असलेले जिल्हा रूग्णालयातले दोन शल्य चिकित्सक नॉट रिचेबल आहेत. बनावट प्रमाणपत्रासाठी (Bogus Certificate) 25 हजारांपासून 1 लाख रूपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचा संशय आहे. आत्तापर्यंत अशाच प्रमाणपत्राआधारे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी बदली करून घेतली आहे अशी माहिती आहे. या प्रकरणात अधीक्षक कार्यालयातील लिपिकासह वैद्यकीय अधिकारी आणि 16 अर्जदारांविरोधात गुन्हा दाखल झालाय.

नाशिक ग्रामीण पोलीस दलात (Nashik Rural Police) आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक असलेल्यांनी विविध जिल्ह्यातून अर्ज सादर केले आहेत. 18 मे 2022 आधी हे अर्ज सादर झाले आहेत. 

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे संबंधित फाइल पोहोचली. तेव्हा, वैद्यकीय अहवाल बनावट असल्याचा संशय आला. अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयाला पुन्हा तपासणीच्या सूचना दिल्या. त्यावेळी काही रुग्णालयातून बनावटरित्या हे प्रमाणपत्र दिले गेले. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील काहींच्या साथीने हा गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अधीक्षकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

नाशिक जिल्ह्यात बदल्यांसाठी पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं धक्कादायक प्रकरण झी 24 तासने चव्हाट्यावर आणल्यावर आता जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय. प्रमाणपत्र देताना सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच हॉस्पिटलांची मान्यता चेक करूनच सही करण्याचे आदेश देण्यात आलेत.