आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस चकमकीत12 कुख्यात आणि खतरनाक नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. छत्तीसगड सीमेजवळच्या (Chhattisgarh Border) वांडोली गावात पोलिसांच्या सी 60 कमांडोंनी बुधवारी सकाळी या नक्षलींना कंठस्नान घातलं. वांडोली गावात काही नक्षलवादी तळ ठोकून असल्याची खबर पोलिसांना मिळाली. आणि सुरू झालं ऑपरेशन नक्षलगड (Operation Naxalgarh ). दुपारी चकमक सुरू झाली... संध्याकाळपर्यंत तब्बल 6 तास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये फायरिंग सुरू होती. संध्याकाळी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली तेव्हा 12 माओवाद्यांचे मृतदेह (12 Naxalites killed) सापडले. त्यांच्याकडून 3 एके 47 रायफली, 2 इनसास, 1 कार्बाईन, 1 SLR यासह 7 स्वयंचलित शस्त्रं जप्त करण्यात आली.
'ऑपरेशन नक्षलगड'
मृतांमध्ये 7 पुरूष आणि 5 महिला नक्षलींचा समावेश आहे. हे सगळे टिपागड, कसनसूर आणि चातगाव दलमशी संबंधित नक्षली होते. चातगाव कसनसूर दलमचा प्रमुख DVCM योगेश तुलावी, कोरची टिपागड दलमचा प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम ऊर्फ विशाल आत्राम, टिपागड दलमचा प्रमुख DVCM प्रमोद कचलामी हे या कारवाईत ठार झाले. त्याशिवाय आणखी 2 उप कमांडरचाही पोलिसांनी खात्मा केला. या सगळ्यांवर तब्बल 300 गुन्हे नोंद होते. त्यांना पकडण्यासाठी 86 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं
या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील आणि 2 पोलीस जवानही जखमी झाले. त्यांना एअर अँब्युलन्सनं नागपूरला उपचारासाठी रवाना करण्यात आलं...
वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई
गेल्या वर्षभरातली पोलीस दलाची ही सर्वात मोठी कामगिरी आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलंय. मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिश: फोन करुन पोलिसांचं अभिनंदन केलं. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना 51 लाख रुपयांची बक्षीस जाहीर केलं. विशेष म्हणजे ऑपरेशन नक्षलगडबद्दल पोलिसांनी गोपनीयता बाळगली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गडचिरोलीतील वडलापेठमध्ये एका स्टील प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आले होते. व्हीआयपी मुव्हमेंट असतानाच, पोलिसांनी नक्षल्यांचा गड उद्ध्वस्त करून त्यांचा खात्मा केला.
नक्षली चळवळीचं कंबरडं मोडणाऱ्या पोलिसांच्या या शौर्याचं सगळीकडून कौतुक होतंय. उत्तर दक्षिण गडचिरोलीतल्या नक्षल चळवळीचा सफाया पोलिसांनी केलाय. आता पोलीस दलाचं पुढचं लक्ष्य असणाराय ते नक्षल्यांचा बालेकिल्ला अबुजमाड...