Monsoon In Maharashtra: मान्सून वेळेआधी भारतात दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसलेला नाहीये. पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार कोसळेला पावसाने मात्र आता ओढ दिली आहे. पावसाने दडी मारल्यामुळं अनेक शेतकरी निराश झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र पाऊस न झाल्याने त्यांच्यावर संकट ओढावू शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनसाठी आणखी एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.
पावसाने देशभरासह महाराष्ट्रातही ब्रेक घेतला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत चार पट अधिक पेरण्या झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिली आहे. त्याचप्रमाणे पावसाचा असमतोल दिसून येत आहे. त्यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समाधानकारक पाऊस होण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे.
बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत नसल्याने राज्यात मान्सूनचा वेग मंदावला आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी किमान 8 दिवस वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस होण्याआधी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा सल्ला पुणे वेधशाळेनं दिला आहे.
पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई मध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातदेखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिली आहे. त्याचप्रमाणे पावसाचा असमतोल दिसून येत आहे.अशा परिस्थितीत पेरणीसाठी अनुकूल वातावरण आणि ओल निर्माण झाल्याशिवाय पुढील पेरणी धरू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, आत्तापर्यंतचा पाऊस : 118 मिमी (95 %) पाऊस झाला आहे. जमिनीत ओल असल्याने तूर्तास चिंता नसल्याचे कृषी विभागाने म्हटलं आहे. खंडाचा कालावधी वाढल्यास पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी च्या 184% इतका पाऊस झालाय. तर सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात म्हणजे सरासरीपेक्षा 85 % कमी पाऊस झाला आहे.