मुंबई : कोरोना काळात ज्यांच्या घरी लग्न आहे किंवा ज्यांना लग्नाला उपस्थिती लावायची आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी देखील आहे. कारण लग्नात जर तुम्हाला उपस्थित राहायचं असेल तर आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असेल, त्या टेस्टवरुन हे सिद्ध होईल की, तुम्हाला कोरोनाची लागण झालेली नाही.
ही बाब धक्कादायक यासाठी की, या आरटीपीसीआर टेस्टसाठी 500 ते 1000 रूपये खर्च होणार आहे. टेस्ट न करता वऱ्हाडी लग्नाला आला आणि सापडला तर 1 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला जाणार आहे. दुसरीकडे या टेस्टमुळे लग्नाला 50 पेक्षा जास्त जण जमणार नाहीत, तेव्हा आरटीपीसीआर टेस्टचा खर्च हाच लग्नाचा आहेर नवरदेव नवरीला मानून घ्यावा लागणार आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे दिवसेंनदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ब्रेक द चेन ही मोहिम राबवली आहे. यामोहिमे अंतर्गत राज्य सरकार 4 एप्रिलपासून वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. त्यातच आता लग्न समारंभासाठी महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लावले आहेत.