महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! कॉलेजमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याने मराठी-कानडी विद्यार्थी भिडले

Maharashtra - Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत, बेळगावमध्ये आणि चे विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा

Updated: Dec 1, 2022, 04:17 PM IST
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! कॉलेजमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याने मराठी-कानडी विद्यार्थी भिडले title=

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद बेळगावच्या  कॉलेजांमध्येही उमटू लागले आहेत. बेळगावातील गोगटे कॉलेजात कर्नाटकचा (Karnataka) झेंडा फडकवण्यात आल्यामुळे मराठी आणि कानडी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादाचं  पर्यावसान तुंबळ हाणामारीत झालं. बुधवारी रात्री झालेल्या या घटनेचे पडसाद आज बेळगावात पाहायाला मिळाले. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या (kannada rakshana vedike) कार्यकर्त्यांनी कॉलेजसमोर जाळपोळ करत काही वेळ रस्ता रोखून धरला.

नेमकी घटना काय?
बेळगावमधल्या गोगटे कॉलेजमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रचं (Maharashtra) समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गट आपापसात भिडले. गोगटे कॉलजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरा  केला जात होता. यात डान्स करताना बारावीच्या एका विद्यार्थ्याने डान्स करतानाच कर्नाटकचा झेंडा फडकावला. यावर महाराष्ट्राचं समर्थन करणारे विद्यार्थी नाराज झाले. याचा विद्यार्थ्यांनी जाब विचारला. यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. कॉलेज व्यवस्थापनाने मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी कॉलेजबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेली नाही. पण या घटनेचं पडसाद कॉलेजबाहेरही उमटले. कर्नाटक रक्षणा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गोगटे कॉलेजबाहेर निदर्शनं केली. कॉलेजसमोरचा रस्त्यावर टायर जाळून रस्ता बंद करण्यात आला, तसंच महाराष्ट्राविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटकवरुन गोव्याला जाणारा रस्त्या अनेक तास जाम करण्यात आला होता. 

दरम्यान, 3 डिसेंबरला महाराष्ट्रातील दोन मंत्री सीमा वादावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांशी बेळगावात चर्चा करणार आहेत. याआधीच सीमावादावर थेट कॉलेजमध्ये वाद निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीनंतर कर्नाटकचे (karnataka) मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर आता दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बसवराज बोम्मई यांनी आधी सांगलीतील जत तालुक्यातील 42 गावांवर दावा सांगितला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर (solapur) आणि अक्कलकोट (akkalkot) प्रदेश कर्नाटकचे असल्याचे सांगितलं आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एक इंचही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत, अशी आमची मागणी आहे, असे बोम्मई यांनी म्हटले होतं.