मुंबई : Maharashtra Rain News : गेले काही दिवस पावसाने राज्यात हाहाकार उडवला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. राज्यात सरासरीच्या 19 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर कोकण (Konkan) विभागासह मराठवाड्यातही ( Marathwada ) सर्वाधिक पाऊस झाला आहे. (Maharashtra has received 19 percent more of its annual average rainfall)
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातल्या धरणात 84 टक्के पाणीसाठा झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनने राज्यात सरासरी ओलांडली आहे. सरासरीच्या 19 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. राज्यातल्या सर्व धरणात मिळून 84 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे यावेळी दुष्काळाचे सावट कमी झाले आहे.
सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात सर्वच विभागांनी सरासरी ओलांडली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने धरणात 20 टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्याची भर पडली आहे. मराठवाड्यातील पाऊस सरासरीच्या तुलनेत 48 टक्के अधिक असून, कोकण विभागात तो 24 टक्क्यांनी अधिक आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात दाणादाण उडाली. याच पावसामुळे मराठवाड्याचा समावेश देशातील सर्वाधिक पावसाच्या विभागात झाला आहे.
गेल्या काही दिवासांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी 2200 कोटींची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 26 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे नकोत तर मदत करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.