नागपूर: राज्य सरकारने गुरुवारी दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य केल्या. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत दूध संघाच्या संचालकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारने दुधाचे दर पाच रुपयांनी वाढवून देण्याची प्रमुख मागणी राज्य सरकारने मान्य केली. येत्या 21 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सरकारने दूध संघांना तसे आदेश दिले आहेत.
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत तशी घोषणा केली. या निर्णयानुसार आता प्रत्येक दूध संघाला उत्पादकांना दुधासाठी प्रतिलीटर किमान 25 रूपये इतका दर द्यावाच लागेल.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी राज्यव्यापी आंदोलनाला यश आले, असे म्हणावे लागेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या निर्णयामुळे आता दूध आंदोलन मागे घेतले जाईल. परिणामी मुंबई आणि अन्य शहरांतील दूध पुरवठा खंडित होण्याचा धोका टळला आहे.