नागपूर: राज्यातील दूध दराचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला असून केंद्र सरकार दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी २० टक्के अनुदान देणार असल्याची माहिती त्यांनी आज नागपूरात बैठकीनंतर दिली. दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर ४० आय़ात शुल्क लावण्यात येणार आहे. याशिवाय आदिवासीक्षेत्र आणि शाळेतील मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना दूध देण्याची योजना विविध राज्यात राबवली जाणार आहे. सहकारी दूध सोसायटी संघांना ३०० कोटी रुपयांचा निधी ५ टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
दूध दरवाढीबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला दूध संघांच्या संचालकांना आणि प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.
तत्पूर्वी आज विधानपरिषदेत दूर दरवाढीच्या मुद्द्यावरून रणकंदन पाहायला मिळाले. राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दूध कोंडीवर आज (मंगळवार, १७ जुलै) विधानपरिषदेत चर्चा झाली. त्यावेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी परराज्यातून आलेल्या दूधवर कर लावण्याची मागणी केली.
सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ढुंकूनही बघत नसल्याचे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दूध भुकटीचे अनुदान पुढचे सहा महिने लागू ठेवावे अशी मागणीही त्यांनी केली.