राज्यातील प्रत्येक शाळेत घुमणार 'जय जय महाराष्ट्र माझा...', मनसेच्या मागणीनंतर सरकारचा मोठा निर्णय

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता प्रत्येक शाळेत "जय जय महाराष्ट्र माझा...!" हे राज्यगीत धुमणार आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Mar 17, 2024, 05:34 PM IST
राज्यातील प्रत्येक शाळेत घुमणार 'जय जय महाराष्ट्र माझा...', मनसेच्या मागणीनंतर सरकारचा मोठा निर्णय title=

Jai Jai Maharashtra Majha Played in School : कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत अंगीकारण्यात आले होते. राज्यगीतावेळी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या होत्या. यात राज्यातील शाळामध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा /प्रार्थना / राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल, अशी सूचना देण्यात आली होती. पण या सूचनेचे पालन होत नसल्याची बाब मनसेने निदर्शनात आणून दिली होती. अखेर मनसेच्या मागणीवर सकारात्मक पाऊल उचलत सरकारने शासन परिपत्रक जारी केले आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शासन निर्णयाचे फोटो पोस्ट केले आहेत. या शासन निर्णयात राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजविले किवा गायले जाण्याबद्दल काही सूचना देण्यात आल्या आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता प्रत्येक शाळेत "जय जय महाराष्ट्र माझा...!" हे राज्यगीत धुमणार आहे. 

मनसेची फेसबुक पोस्ट

"जय जय महाराष्ट्र माझा..." हे गीत राज्यगीत म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारून 1 वर्ष उलटल्यानंतरही या गीताला त्याचा उचित सन्मान मिळत नव्हता. कोणत्याही शैक्षणिक संस्थेत आपलं हे राज्यगीत गायलं वा वाजवलं जात नव्हतं! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी - 27 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यात त्यांनी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजविले/ गायिले जावे अशी आग्रही अपेक्षा व्यक्त केली होती. 

अमित ठाकरे यांच्या या पत्राचा सकारात्मक परिणाम शासन दरबारी झाला. पत्रानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश / परिपत्रक काढले आहे. त्यानुसार "सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दैनिक सत्र (दररोजचे वर्ग) सुरु होताना राष्ट्रगीत/ प्रार्थना यांसोबत राज्यगीत वाजवले/ गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे. तसेच या सूचनेचे पालन होत आहे ना, याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यायची आहे!" असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत. 

अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यानंतरच राज्यातील शाळांमध्ये राज्यगीताचा सन्मान होत नसल्याची बाब राज्य सरकारच्या, विशेषत: शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आली. म्हणूनच शालेय शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता यापुढे प्रत्येक शाळेत "जय जय महाराष्ट्र माझा...!" निनादणार आहे, असे मनसेने पोस्टमध्ये म्हटले आहे.