महाराष्ट्र एक पाऊल पुढे | कोरोना संकटात संधी शोधा, धाडसी पाऊल टाका- देवेंद्र फडणवीस

कोरोनानंतर समोर येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं?

Updated: Jun 27, 2020, 10:37 PM IST
महाराष्ट्र एक पाऊल पुढे | कोरोना संकटात संधी शोधा, धाडसी पाऊल टाका- देवेंद्र फडणवीस title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटात जगाचं अर्थकारण कोलमडलं आहे, पण कोरोनानंतर समोर येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं? कोरोनानंतरचा महाराष्ट्र कसा असेल? याबाबत 'झी २४ तास'च्या ई-संवाद - महाराष्ट्र एक पाऊल पुढे' या खास कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. देवेंद्र फडणवीसांनी याबाबत त्यांचं व्हिजन मांडलं. 

'कोरोना हे संकट असलं तरी या संकटात संधी शोधायची असते. पुढे पडणारं पाऊल हे धाडसी असलं पाहिजे, त्यामुळे सरकारने धाडसी पावलं टाकली पाहिजेत,' असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला आहे. 

धाडसी पावलं टाकताना टीका होऊ शकते, एखादा निर्णय चुकू शकतो. बरोबर निर्णय घेतल्यानंतरही तो जनतेला भावत नसल्यामुळे टीका होते, पण राज्यकर्त्यांनी हे सगळं सहन केलं पाहिजे. राज्याला पुढे न्यायचं असेल, तर लोकांच्या दोन शिव्या खायचीही तयारी असली पाहिजे. या काळात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या पाहिजेत, कारण या काळात सुधारणा स्वीकारायची जनतेची मानसिकता असते. या काळात सरकारच्या उद्देशावर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तयारी करण्याची आवश्यकता आहे. चीनमधून या कंपन्या महाराष्ट्रात येत असतील तर त्यांना व्यवसायात अडचण येणार नाही. परवानग्यांच्या कचाट्यात या कंपन्या सापडणार नाहीत. तसंच गुंडगिरी होणार नाही आणि कामगार कायद्यांचा विपर्यास होणार नाही, या सगळ्या गोष्टी आपण कंपन्यांना पटवून दिल्या पाहिजेत. या गोष्टी पटवून दिल्या, तर या कंपन्या महाराष्ट्रात येतील आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं फडणवीस म्हणाले. 

कोरोनानंतरचा महाराष्ट्र उभा करताना संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगिण विचार व्हावा. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र यांचाही विकास करताना विचार झाला पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.