Recipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा

Maharashtra Din Recipe: महाराष्ट्रीय लोकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मिरचीचा ठेचा. एकाच मिरच्यांपासून तीन वेगळ्या पद्धतींचा ठेचा कसा बनवायचा जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 1, 2024, 09:04 AM IST
Recipe: झणझणीत गावरान मिरचीचा खर्डा; 3 पद्धतीने बनवा अस्सल महाराष्ट्रीय ठेचा title=
Maharashtra Din 2024 How to make Hirvi Mirchi Cha Thecha recipe in marathi

Maharashtra Din Recipe: हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खर्डा म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटते. महाराष्ट्राची रेसिपी असलेली हा खर्डा आता देशभरात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आता अनेक हॉटेलांत मिरचीचा ठेचा बनतो. मात्र अस्सल गावरान चव मात्र त्याला येत नाही. गरमा गरम भाकरी आणि झणझणीत ठेचा व जोडीचा कांदा या जेवणाने मराठी माणूसाचे मन आणि पोटही तृप्त होते. झणझणीत ठेचा कसा बनवायचा हे पाहूया. तीन प्रकारचा झणझणीत ठेचा याची रेसिपी पाहूया. 

साहित्य

एक वाटी मिरच्या, तेल, मीठ, शेंगदाण्याचा कूट, लसूण, एक कांदा बारीक चिरुन, जिरे आणि मोहरी

कृती

सगळ्यात आधी एका कढाईत तेल घेऊन त्यात मिरच्या परतून घ्या. मिरच्या दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या. मिरच्यांचा रंग बदलला की त्यानंतर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घाला. त्यानंतर यात एक चमचा जिरे टाकून सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्या. आता हे सर्व साहित्य खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे मिश्रण वाटताना त्यात चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला तिखट व झणझणीत ठेचा खायला आवडत असेल तर. तुम्हा असाचदेखील हा ठेचा खावू शकता. मात्र, कमी तिखट आवडत असलेल्या लोकांसाठी दुसऱ्या पद्धतीने ठेचा बनवू शकता. 

दुसरी पद्धत

ठेचा वाटून झाल्यानंतर आता पुन्हा एका कढाईत तेल घ्या. त्यानंतर त्यात जिरे मोहरी घाला. जिरे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा परतून घेतल्यानंतर त्यात बारीक वाटलेला ठेचा घाला व रंग येण्यापूरती हळद घाला. आता हा ठेचा मध्यम तिखट होईल. कांदा घातल्यामुळं यातील तिखटपणा कमी होतो. 

तिसरी पद्धत

तुम्हाला आणखी कमी तिखटाचा ठेचा हवा असल्यास तुम्ही त्यात शेंगदाण्याचा कुट घालून तिखटपणा कमी करु शकता. शेंगदाण्याच्या कुट घातलेला ठेचा लहान मुलंदेखील खाऊ शकतात. अजिबात तिखट नसेलला हा ठेचा तुम्ही, चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. तसंच, फक्त वरण-भात असेल तर तोंडी लावायलाही ठेचा खाऊ शकता.