'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप

Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 24, 2024, 04:30 PM IST
'आरोपीचं xxxच काढून टाकलं पाहिजे'; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप title=

Ajit Pawar on Badlapur Case : बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी यवतमाळ मधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात दिली. बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) चालवून आरोपी फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. 

काय म्हणाले अजित पवार
'जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याला इतकं कडक शासन करणार, आमचा तर प्रयत्न सुरु आहे शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे, तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे. माझ्या तर मनात वैयक्तिक आहे, अशा प्रकारची विकृत माणसं, ज्यावेळेस आमच्या आई-बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात, त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, की पुन्हा तसा विचारही त्यांच्या मनात येता कामा नये'

'माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच. हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोकं आहेत, जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे' असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

काय आहे बदलापूर प्रकरण?
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलिंवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी  पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो 24 वर्षांचा आहे. शाळेत साफ सफाई करण्याबरोबरच लहान मुला-मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याचं काम तो करत होता. मुलं अक्षयला काठिवाला दादा म्हणून ओळखायचे. कंत्राटी पद्धतीवर अक्षयला बदलापूरच्या शाळेत नोकरी मिळाली होती.  

बदलापूर येथील शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले आहेत. याप्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.