आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : १ मे १९६०... महाराष्ट्र राज्याचा हा स्थापना दिन... या दिवसाचं स्मरण राहावं म्हणून या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन केंद्र सरकारनं एक स्मरणपदक जाहीर केलं... पण, या पदकांची महाराष्ट्रातच किंमत उरली नाही... आता हा इतिहासाचा ठेवा जपण्याचं महत्त्वाचं काम चंद्रपुरातला एक माणूस करतोय.
महाराष्ट्राचा गौरव, सन्मान करणाऱ्या नाण्यांवर उत्तम नक्षीकाम, महाराष्ट्राच्या प्रगतीचा पथप्रदर्शक असलेला लामणदिवा... आणि छत्रपतींची राजमुद्रेवरची 'मुद्रा भद्राय राजते' ही प्रेरणादायी अक्षरं... तर नाण्याच्या मागच्या बाजूला सार्वभौम भारताच्या अस्तित्वाचं चिन्ह असलेले ४ सिंह... तांबं आणि निकेल या धातूंनी तयार केलेलं हे स्मरणपदक महाराष्ट्राचा इतिहास मिरवणारं... १ मे १९६० चा तो दिवस... मोठ्या संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
एका शानदार सोहळ्यात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चमचमत्या प्रकाशातला महाराष्ट्र राज्याच्या सीमा दाखविणारा फलक लोकार्पित केला. या संस्मरणीय कार्यक्रमाला आणखी झळाळी आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक स्मरणपदक जारी केलं. महाराष्ट्राच्या स्थापना कार्यक्रमात सहभागी गणमान्य व्यक्तींना ही नाणी देण्यात आली. नाणेसंग्रह करणाऱ्या अशोकसिंग ठाकूर यांना नांदेड शहरात एका मजुराच्या गळ्यात हे पदक लॉकेट म्हणून आढळलं... इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान असलेला हा ठेवा त्यांनी या मजुराकडून विकत घेतला. त्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा लुप्त होण्याआधी त्याचा संग्रह करण्याचा निश्चय ठाकूर यांनी केला... आणि आता त्यांच्या संग्रहात १९० पदकं जमा झालीत.
एखादा राजा जेव्हा पदारुढ व्हायचा, त्यानंतर तो आपल्या मुद्रेची किंवा नावाची नाणी घडवायचा... महाराष्ट्राच्या स्थापनेनिमित्त तत्कालीन धोरणी नेत्यांनी अशी स्मरण पदकं जारी केली... आता हा ठेवा जपण्याचं आणि इतिहासाचा मान राखण्याचं मोठं काम अशोकसिंग ठाकूर करत आहेत.