सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?

Sada Sarvankar : मुंबईतील माहीम मतदारसंघाची जागा महायुतीची कसोटी पाहणार असल्याची चिन्हं आहेत. कारण माहिममधून निवडणूक लढवण्यावर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर ठाम आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Oct 27, 2024, 11:46 PM IST
सदा सरवणकर यांचा एक निर्णय महाराष्ट्राचे राजकारण बदलणार?  title=

Maharashtra Assembly Elections 2024 : माहीम मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याच्या मुद्यावर भाजपनं ठाम भूमिका घेतलीये  तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशातच सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय.. भेटीनंतर येत्या 24 तासात भूमिका ठरवण्यासाठी सरवरणकरांना मुदत देण्यात आलीय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. शिवसेनेकडून  विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिलीय. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून महेश सावंत  रिंगणात आहेत.  लोकसभा निवडणुकीत  राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची बिनशर्त परतफेड करण्यासाठी अमित ठाकरे यांच्यासाठी  महायुती आपला उमेदवार मागे घेणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. 

माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सदा सरवणकर यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या शाखेबाहेर गर्दी केली. तसेच सरवरणकरांनी निवडणुकीतून माघार न घेण्याची मागणी केली.  त्यानंतर सरवणकरांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. 

सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्यास माहीम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाची साथ मात्र मनसेच्या अमित ठाकरेंना मिळेल अशीही चर्चा सुरू आहे. 
2009 मध्ये माहिम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते नितीन सरदेसाई 48 हजार मतांनी निवडून आले होते. तर, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून संदीप देशपांडे यांना 42 हजार मतं मिळाली होती. 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजपच्या विलास आंबेकर यांना 33 हजार मतं मिळाली होती. त्यामुळं माहिमध्ये भाजपचे देखील चांगली ताकद आहे. मनसेला भाजपाचा पाठिंबा मिळाल्यास अमित ठाकरे सहज निवडून येऊ शकतात.  अशा राजकीय परिस्थितीत भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.