Raj Thackeray On Sharad Pawar In Amaravati Rally Speech: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमरावतीमधील जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. अमरावती मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी घेतलेल्या जाहीर सभेत शरद पवारांचा 'संत' असा उपहासात्मक उल्लेख करत ते जातीपातीचं राजकारण करतात अशी टीका केली. यावेळेस त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचाही आवर्जून उल्लेख केला.
"आपण मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून कधी विचार करणार आहोत का नाही? हिंदू फक्त दंगलीत एकत्र असतो बाकीच्या वेळेस तो हिंदू नसतो. आणि हेच बाहेरच्यांना हवं आहे. मी एक क्लिप पाहिली आज, एक मुसलमान मौलवी मशिदीतून फतवा काढतो की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक गठ्ठा मतदान करा असे फतवे निघत आहेत. लोकसभेला पण हेच घडलं. मग हिंदू का विखुरलेले? असा सवाल उपस्थित करत राज यांनी पुढे बोलताना शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांचा संत असा खोचक उल्लेख करत राज ठाकरेंनी, "हिंदू एकत्र येऊ नये म्हणून शरद पवार नामक संताने महाराष्ट्रात जातीजातीत विष पेरलं. जेम्स लेन प्रकरणात महाराजांच्याबद्दल काही वेडीवाकडी वाक्य होती, ते पुस्तक कोणी वाचलं होतं? त्यावर बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेहंदळें यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या मजकुरावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पवारांनी भांडारकर संस्थेवर आरोप करवून घेतला की याच संस्थेनेच म्हणे ही चुकीची माहीती दिली. आणि पुढे बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप करून शरद पवारांनी आधी ब्राह्मण-मराठा वाद भडकवला आणि पुढे मराठा-ओबीसी वाद पेटवला. तुम्ही मराठी म्हणून किंवा हिंदू म्हणून एकत्र येऊ नये ही पवारांची इच्छा आहे," अशी कठोर शब्दांत टीका केली.
काही दिवसांपूर्वी ठाण्यात घेतलेल्या जाहीर सभेतही राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती. "महाराष्ट्रात फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं. महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा पक्ष फोडले. पण गेल्या पाच वर्षात कळस गाठला. गेल्या पाच वर्षात आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण घेऊन गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं राज म्हणाले होते.
नक्की वाचा >> 'नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी...', राज ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कितीवेळ बाहेर...'
"शरद पवारांनी जातीपातीचे विष पसरवलं. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा त्यांना प्रश्न पडला की हिंदुत्वाला उत्तर कसं द्यायचं मग त्यांनी हिंदूंना विभागणारं जातीचं राजकारण पुढे केलं. जातीचं प्रेम आधीपासून होतं पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष हा मात्र शरद पवारांच्या काळात निर्माण झाला. आपण महापुरुष जातीत वाटून टाकले. हे गेल्या 10 वर्षात सुरु झालं. आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून याचा विचार करणार आहोत की नाहीत?" असा सवाल राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करताना ठाण्याच्या सभेत विचारला होता.
"यवतमाळ असू दे किंवा इतर अनेक जिल्हे हे आज कशासाठी ओळखले जातात तर कधी आत्महत्या करणाऱ्यांचा जिल्हा तर एखादा जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. याला काय अर्थ आहे? कुठे गेला मग इतक्या वर्षांचा विकास?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> 'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा
"2024 ची निवडणूक महत्वाची आहे. तुमच्या मतांशी ज्यांनी ज्यांनी प्रतारणा केली त्यांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे. मला या महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून येत्या 20 नोव्हेंबरला माझ्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या," असं राज भाषणाचा शेवट करताना म्हणाले. तसेच येथील स्थानिकांना आश्वासन देताना राज यांनी, "माझा जाहीरनामा पुढच्या 4 ते 5 दिवसांत येईल त्यात मी तीच आश्वासनं देईन जी पूर्ण होतील," असंही म्हटलं.